आता होणार एक्सरे मोबाईल व्हॅनद्वारे क्षयरोग रुग्णांची तपासणी

गोंदिया: शासन क्षयमुक्त भारतासाठी विविध मोहिम राबवित आहे. या मोहिमेचा भाग म्हणून आता जिल्ह्यात प्रत्येक गावात एक्सरे मोबाईल व्हॅनद्वारे संशयीत क्षयरोग रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत संशयित क्षयरुग्णांसाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे क्षयरोग संशयित रुग्णांचे थुंकी नमुने तपासले जात असून संशयीत रुग्णाने छातीचे एक्स-रे काढणे गरजेचे आहे. क्षयरोग यासंबंधी असलेल्या गैरसमजुती, अज्ञानपणा, जागृती अभावी गोरगरीब लोक मोलमजुरी सोडून, शुल्क भरून खाजगी दवाखान्यात छातीचे एक्स-रे काढत नाही.

अशा रुग्णांसाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत शासन आपल्या गावी मोहिमेच्या संकल्पनेतून मोबाईल एक्स-रे वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. 18 जानेवारी रोजी प्राआ केंद्र चान्ना बाक्टी, 19 रोजी प्राआ केंद्र धाबेपवनी, 20 ला प्राआ केंद्र केशोरी, 22 रोजी प्राआ केंद्र कोरंभीटोला, 23 रोजी प्राआ केंद्र महागाव व 24 रोजी प्राआ केंद्र गोठणगाव येथे क्षयरोग संशयित रुग्णांचे निशुल्क एक्स-रे काढण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत यांनी सांगीतले. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व खाजगी आरोग्य क्षेत्रातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व संबंधित नागरिकांनी मोफत सोयी सुविधांचा लाभ त्यांच्या कार्यक्षेत्रातील रुंग्णाना अवगत करुन तालुका क्षयमुक्त करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी केले आहे.

तीन आठवड्यापेक्षा अधिक काळ खोकला, बेडकायुक्त खोकले, थुंकीतून किंवा खोकल्यातून रक्त येणे, खोकताना छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा, भूक व वजन कमी होणे, झोपल्यावर घाम येणे, सर्दी आणि सौम्य स्वरूपाचा ताप ही क्षय रोगाची लक्षणे आहेत. रुग्णांमध्ये लक्षणावरून आणि शारीरिक तपासणी वैद्यकिय अधिकारी यांच्यामार्फत करणे आवश्यक असते. याशिवाय रक्त चाचणी, थुंकीची व बेडक्याची तपासणी, छातीचा एक्स-रे इत्यादी चाचण्या टीबीच्या निदानासाठी करण्यात येतात.

Share