शिक्षक मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकल शाळेला कुलूप
गोंदिया : तालुक्यातील अदानी येथील पालक व ग्रामपंचायत प्रशासनाने शिक्षक मागणीसाठी स्थानिक जिल्हा परिषद शाळेला 18 जानेवारी रोजी कुलूप ठोकले. मात्र त्यानंतरही प्रशासन उदासिन असल्याने रोष व्यक्त होत आहे.
अदासी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गात 184 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेचे मुख्याध्यापक मुख्याद्यापक आर. सी. मंडेले तसेच शिक्षक आर. एन. उपवंसी यांची इतर दुसर्या कमी पटसंख्या असलेल्या शाळेत प्रतिनियुक्ती करण्यात आली. शाळेत कार्यरत 4 शिक्षकापैकी 1 शिक्षक 31 जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे तीन शिक्षकांच्या खांद्यावर ज्ञानदासह अन्य कार्याचा भार राहणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात शिक्षण व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत प्रशासनाने गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, तसेच जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन दिले. मात्र त्यांनी दखल घेतली नसल्याने शिक्षकांच्या मागणीसाठी 18 जानेवारी रोजी प्रशासनाला निवेदन देऊन शाळेला कुलूप ठोकण्यात आले. त्यानंतर प्रसंगी केंद्रप्रमुख आले व आश्वासन देऊन शाळा उघडून निघून गेले. मात्र शिक्षकांची मागणी कायम असल्याने प्रशासनाचे धोरण उदासिन असल्याचा रोष व्यक्त होत आहे. आंदोलनात सरपंच उषा भोंडे, उपसरपंच सुधीर ब्राह्मणकर, शिक्षण समितीचे अध्यक्ष रामेश्वर उके, पालकवर्ग, गावकरी व विद्यार्थी सहभागी झाले.