धोटे बंधूचे 95 टक्के विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण

गोंदिया : स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातील चौथ्या सेमिस्टरचे 95 टक्के विद्यार्थी गणित विषयात अनुत्तीर्ण झाल्याचे विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालातून उघडकीस आले. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त करून उत्तर पत्रिका तपासणीत घोळ झाल्याचा आरोप करीत पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी शुक्रवार, 19 जानेवारी रोजी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत केली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचा हिवाळी 2023 परीक्षेचा निकाल 12 जानेवारीला जाहीर झाला. शहरातील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातील बीएससी चौथ्या सेमिस्टरच्या निकालात तब्बल 95 टक्के विद्यार्थ्यांना गणित विषयात अनुत्तीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिका तपासणिका विरोधात रोष व्यक्त केला आहे. धोटे बंधू महाविद्यालयातील चौथ्या सेमिस्टरच्या पीसीएम, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर आणि इ-कॉम ग्रुपच्या 60 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 65 टक्के विद्यार्थ्यांना गणित विषयात शून्य गुण देण्यात आले.

तर 30 टक्के विद्यार्थ्यांना शून्य ते 20 गुण देण्यात आले. निकाल बघता महाविद्यालयातील परीक्षा दिलेले 95 टक्के विद्यार्थी गणित विषयात अनुत्तीर्ण दाखविण्यात आले. हा निकाल बघून विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. उत्तरपत्रिका योग्यरित्या तपासण्यात आल्या नाहीत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. उत्तरपत्रिकांचे तत्काळ पुनर्मूल्यांकन करून न्याय देण्याच्या मागणीसाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंना विद्यार्थ्यांनी निवेदनही दिले आहे. शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी तत्काळ पुन्हा उत्तरपत्रिकांची तपासणी करावी. पुर्नतपासणी आणि पुर्नपरीक्षेसाठी लागणारे शुल्क परत करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी पत्र परिषदेतून केली.

विद्यार्थ्यांचा निकाल पाहून आम्हालाही धक्काच बसला. संगणकीकरण, तांत्रिक चूक होऊ शकते, विद्यापीठाचे उपकुलपती व इतर अधिकार्‍यांना या संदर्भात कळविण्यात आले आहे, विद्यापीठ काम करीत असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य अंजन नायडू यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share