जिल्हा आदर्श शिक्षकांच्या पात्र यादीत खोडतोड, घोळ झाल्याचा संशय

गोंदिया ◼️शिक्षकदिनानिमित्त दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. त्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा 3 जानेवारीला गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केली. या घोषित केलेल्या यादीवरून पुरस्कार निवडीत घोळ झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात असून गोंदिया पंचायत समिती गटातून निवड झालेल्या शिक्षिकेच्या नावासमोरील शाळेच्या नावावरून यादी तयार करताना पात्र शिक्षकाला तर डावलले गेले नाही ना, अशी चर्चा शिक्षकांच्याच गटात रंगली आहे. यामुळे शिक्षण विभागातील सावळागोंधळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा गौरव व्हावा, या उद्देशाने शिक्षकदिनी शिक्षकांना गौरविण्यात येते. या उद्देशाने शिक्षण विभागाने पुरस्कार प्रक्रिया ऑफलाइन केली. यात इच्छुक शिक्षकांनी स्वतःहून अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर केली होतीयातून अंतिम 8 शिक्षकांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे एकापेक्षा अधिक अर्ज असल्यास अर्ज करणाऱ्या शिक्षकांची मुलाखत यापूर्वी घेतल्या गेल्या होत्या मात्र यावर्षी या नियमाला फाटा देण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यातच जाहीर झालेल्या या पुरस्काराच्या यादीकडे बघितल्यास गोंदिया पंचायत समिती स्तरावर ज्या शिक्षिकेची निवड या पुरस्काराकरीता झाली त्यांच्या नावापुढे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्रा लिहिलेले आहे. त्यानंतर त्या खर्रा या नावाला कापून त्या ठिकाणी गिरोला हे नाव लिहिण्यात आले. या खोडाखोडीवरून खर्रा येथील शाळेच्या शिक्षकाचाही या पुरस्काराकरीता अर्ज होता, हे स्पष्ट झाले आहे. निवडकर्त्या समितीने खर्रा शाळेच्या शिक्षकाच्या प्रस्तावालाच आपली पसंती दिली, हे यावरून स्पष्ट होते.

8 तालुक्यांपैकी 2 तालुक्यांतील माध्यमिक शिक्षकांची निवड

गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्राथमिक गटातून भारती तिडके जि. प. उच्च प्राथ. शाळा गिरोला गोंदिया यांची निवड केली आहेत्याचप्रमाणे तिरोडा पंचायत समिती स्तर निशा वंजारी, आमगाव पंचायत समिती स्तर ओंकार बिसेन, सालेकसा पंचायत समिती स्तर रोषणलाल लिल्हारे, देवरी पंचायत समिती स्तर वसंत नाईक व अर्जुनी मोरगाव पंचायत समितीमधून लार्केश्वर लंजे यांची निवड आदर्श शिक्षक पुरस्काराकरीता करण्यात आली आहे. माध्यमिक विभागातून 8 तालुक्यांतून फक्त 2 तालुक्यांतील शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये गोरेगाव येथील शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या नंदा गजभिये व सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे सुनील भिमटे यांची निवड केली आहे.

Share