जिल्हात मनरेगात 12 कोटींचा घोटाळा उघड, देवरी तालुका घोटाळ्यात अव्वल
🔺 203 कामांची चौकशी पूर्ण, काहींची सुरूच मनरेगात 12 कोटींचा घोटाळा उघड
प्रहार टाईम्स वृत्त संकलन
गोंदिया◼️ जिल्ह्यात 2017-18 या वर्षातील 212 कामांत अनागोंदी कारभार असून त्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यापैकी 203 कामांची चौकशी पूर्ण झाली असून त्यात 12 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीत दिसून आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मनरेगा अंतर्गत वनविभागात वनतलाव, वनतळी व वनबंधाऱ्यांचे बांधकाम केले जाते. गोंदिया जिल्ह्यात 2017-18 या वर्षात देवरी, अर्जुनी-मोरगाव, सालेकसा, आमगाव व गोरेगाव या 5 तालुक्यांत मनरेगांतर्गत करण्यात आलेल्या 212 कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या तालुक्यातील मनरेगाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिस्तरीय समिती गठित केली. त्यात एक उपविभागीय अभियंता, एक साहाय्यक लेखाधिकारी व एका विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यात 133 कामांमध्ये 10 कोटी तीन लाख 77 हजार 569 रुपये तर उपवनसंरक्षकांनी 8 कामांची चौकशी केली असता एक कोटी 88 लाख 81 हजार 569 रुपयांची तफावत असल्याचे पुढे आले. एकूण 203 कामांची चौकशी पूर्ण झाली असून चौकशी अहवालानुसार 11 कोटी 92 लाख 59 हजार 138 रुपयांचा अपहार झाल्याचे पुढे आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील 5 तालुक्यांत मनरेगाची बोगस कामे झाली. त्यात देवरी तालुका आघाडीवर आहे. देवरी तालुक्यातील 112 कामे, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील 61 कामे, सालेकसा तालुक्यातील 36 कामे, आमगाव तालुक्यातील 2 कामे तर गोरेगाव तालुक्यातील एका कामावर चौकशी समिती बसविण्यात आली. वनविभागात जरी काम झाले असले तरी या कामाचे पैसे तहसीलदार देतात. वनक्षेत्राधिकारी यांच्याबरोबर तहसीलदारही या कामात अग्रेसर असल्याची माहिती समोर आली आहे.