गोंदियातील शासकीय रक्तपेढीत रक्त तुटवडा, खासदार मेंढे यांनी अधिकाऱ्यांची केली कान उघळणी

गोंदिया : शासकीय रक्त संकलन पेढीत रक्ताचा आजघडीला तुटवडा आहे. रक्तदान कमी व रक्ताची मागणी जास्त असल्यामुळे रक्तदान शिबिराची मोठ्या प्रमाणात गरज आहे. जीवन मरणाच्या दारात असलेल्यांना आशेचा किरण दाखविणार्‍या येथील रक्तपेढीत रक्ताचा पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक सुदृढ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील 15 लाख लोकसंख्येसाठी एकमेव रक्त संकलन पेढी येथील शासकीय बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय येथे जिल्ह्याच्या सीमावर्ती राज्य मध्यप्रदेश, छत्तीसगडसह सीमावरती जिल्ह्यातील नागरिकही उपचार घेतात. सिकलसेलग्रस्त, प्रसूत महिला व अपघातग्रस्तांना रोज 12 ते 15 पिशव्या रक्ताची गरज असते. सेवाभावी संस्था, राजकीय पक्षांच्या माध्यमातून आयोजित शिबिरातून रक्तसंकलन केले जाते. खासगी रक्तसंकलन पेढ्या जिल्ह्यात रक्तसंकलन करून नागपूर येथे नेतात. नेत्यांचा वाढदिवस, सण, उत्सव, संस्थांचा वर्धापण दिनानिमित्त रक्तदान शिबिराच्या आयोजनातून अनेक जण रक्तदान करतात.

काही लोक शासकीय रक्तसंकलन पेढीला तर काही खासगी पेढ्यांना रक्त देतात. शासकीय रक्तसंकलन पेढीत रक्तदान केल्यास डोनरकार्डवर रक्ताचा पुरवठा निःशुल्क केला जातो. रक्तदाता नसल्यास व रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल असल्यास 450 रुपये व खाजगी रुग्णालयात दाखल असल्यास 850 रुपये शुल्क घेतले जाते. परंतु खासगी रक्तसंकलन पेढ्या रक्ताच्या एका पिशवीसाठी 1200 ते 1500 रुपये घेतात. येथील शासकीय रक्तपेढीत तीन दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक आहे. गरजूंना रक्त मिळावे म्हणून बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील रक्तपेढीत प्रत्येक सुदृढ व्यक्तीने रक्तदान करण्याची गरज आहे.

रक्तदानासाठी पोषक वातावरण आहे. रक्तदान करण्यासाठी नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. रक्तदान शिबिराचे आयोजनही कमी झाले आहे. सिकलसेलग्रस्त, प्रसुत महिला, अपघातग्रस्तांना रक्तांची गरज असते. आजस्थितीत शासकीय रक्तपेढीत केवळ तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. सेवाभावी संस्था, राजकीय संस्थांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, प्रत्येक सुदृढ नागरिकांनी भीती न बाळगता रक्तदान करावे, असे आवाहन शासकीय रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. संजय माहुले यांनी केले आहे.

बाई गंगाबाई महिला रुग्णालयात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याने महिला रुग्णांचा होणारा त्रास पाहता भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यांनी गोंदिया येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन लावत याप्रकाराचा जाब विचारला. फोनवरून त्यांच्या क्लास घेतला. भविष्यात रक्ताचा तुतवडा भासू नये म्हणून आवश्यक ते उपाय करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Share