जिप शाळेच्या 200 वर्गखोल्यांची स्थिती गंभीर, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका

♦️शासन, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

गोंदिया◼️ शासनाने अतिमहत्वाच्या असलेल्या शिक्षण विभागाकडेच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी गळती सुरु आहे. तर दुसरीकडे शेकडो शाळांच्या इमारतींची दुरावस्था आहे. जिल्ह्यात 1 हजार 645 जिल्हा परिषदेच्या शाळा असून यापैकी 200 वर्गखोल्या जीर्णावस्थेत आहे. यातील 183 वर्गखोल्यांचे बांधकाम करणे गरजेचे असून यासाठी जिल्हा परिषदेला 27 कोटी रुपये निधीची गरज आहे. मात्र निधीच नसलयाने विद्यार्थ्यांना जीर्ण वर्गखोल्यातून शिक्षण घ्यावे लागत आहे.

एकेकाळी जिल्हा परिषदेच्या शाळा गजबजलेल्या असायच्या. तयावेळी शिक्षकांना कमी वेतन असले व इतर भौतिक सुविधा मिळत नसल्या तरी पालकांचा कल शासकीय शाळेत पाल्यांना दाखल करण्यावर असायचा. मात्र, गेल्या काही वर्षात शासनाचे शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. शिक्षकांची अपुरी संख्या, त्यांच्यावरील अतिरिक्त कामाचा ताण, शिक्षण क्षेत्रासाठी लागणार्‍या निधीसाठी आखुडता हात, जीर्ण झालेल्या इमारती आदी कारणामुळे पालक आपल्या पाल्यांना पैसे भरुन खासगी शाळेत पाठवित आहे. त्यामुळे मोफत शिक्षण असताना देखील जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत चालल्या आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 645 शाळा आहेत.

या शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र त्या शाळांपैकी 200 वर्गखोलया जीर्ण असून कधीही छत कोसळण्याची भीती राहते. अनेक शाळांतील वर्गखोल्यांना गळती लागली असून ताडपत्रीचा आधार घेत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागत आहे. आजघडीला किमान 183 वर्गखोल्यांचे बांधकाम करणे नितांत गरजेचे आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करुन जिल्हा परिषदेने नियोजन समितीकडे पाठविला आहे. या वर्गखोली बांधकामासाठी 27 कोटी निधीची गरज आहे. मात्र, नियोजन समितीकडून तोडका निधी मंजूर केला जात आहे. जोपर्यंत निधी येतो, तोपर्यंत दुसर्‍या शाळेतील वर्गखोली जीर्ण झालेली असते अशी अवस्था आहे. शाळांच्या या स्थितीमुळे विद्यार्थ्यांचा जीव देखील टांगणीला असतो. मात्र, शासन, लोकप्रतिनिधी व अधिकारी देखील या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share