जिल्हातील 999 रेशन दुकानदार १६ जानेवारी पर्यंत संपावर

गोंदिया: धान्यावरील कमिशनमध्ये वाढ, स्वस्त धान्य दुकानदारांना आरोग्य सुविधा आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी 1 जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. हा संप 16 जानेवारपर्यंत राहणार असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील 1 लाख 71 हजार कार्डधारकांना बसणार आहे.

दिवसेंदिवस महागाई वाढत असताना मागील अनेक वर्षात शासनाने रेशन दुकानदारांचे कमिशन वाढविले नाही. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात टाकून दुकानदारांनी नागरिकांपर्यंत धान्य पोहोचवले. काही जणांचा मृत्यूही झाला. परंतु शासनाने अद्याप रेशन दुकानदारांच्या मागण्यांची दखल घेतली नाही. आपल्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व मागण्या पूर्ण करवून घेण्यासाठी जिल्ह्यातील 999 रेशन दुकानदारांनी नववर्षाच्या पहिला दिवस 1 जानेवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.

स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, पूर्ण मार्जिनची रक्कम निर्धारित वेळेत देण्यात यावी, प्रति क्विंटल 300 रुपये मार्जिन देण्यात यावी, प्रति महिना व्यवस्थापन खर्च 5 हजार रुपये देण्यात यावा, आनंदाची शिधा योजना वर्षभर राबविण्यात यावी, सोयाबीन ऐवजी सूर्यफूल तेलाचे वितरण करण्यात यावे, निर्धारित प्रमाणात धान्याची हाताळणूक स्वच्छता व वितरण तूट मंजूर करण्यात यावी, 4 जी पॉस मशिन देण्यात यावी, स्वस्त धान्य दुकानदारांना आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात आदी मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. हा संप 16 जानेवारीपर्यंत राहणार असून या कालावधीत धान्य स्वीकारणे, धान्य वितरीत करणे व शासनाला माहिती पुरविणे ही सर्व कामे बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर रेशन दुकानदार धरणे आंदोलनात सहभागी झाले. 16 जानेवारीनंतरही मागण्यांची पूर्तता न झाल्यास दिल्ली येथे संसद भवनापर्यंत जाऊन पंतप्रधानांना निवेदन देण्यात येणार आहे.

आम्ही वारंवार शासनाला निवेदन दिले. कठीण काळात देखी स्वस्त धान्य दुकानदारांनी काम केले. त्यांचा अत्यल्प मोबदला देण्यात येत आहे. वारंवार मागण्याकडे दुर्लक्ष झाल्याने देशव्यापी संप करावा लागला. कार्डधारकांना त्रास देण्याचा हेतू नाही. मात्र शासनाच्या अडेलतट्टूपणामुळे नाईलाजाने संप करावा लागत असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगराज रहांगडाले यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share