नवीन वाहन कायद्याचे गोंदियातही पडसाद
– टायर जाळून निषेध
– अनेक आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात
गोंदिया◼️रस्ते अपघाताबाबत सरकारच्या जाचक व अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ वाहन चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. यात गोंदियातील चालकांनीही भाग घेत केंद्र सरकारच्या नवीन वाहन अपघात कायद्याच्या निषेध करून ठिकठिकाणी निदर्शने केली, रस्त्यावर टायर जाळण्यात आली.
केंद्र सरकारने पारित केलेला नवीन मोटार वाहन कायदा आजपासून संपूर्ण देशभर लागू करण्यात आला. हा कायदा वाहन चालकांवर अन्यायकारक असल्याच्या निषेधार्थ देशभरात तीन दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे. या संपात जिल्ह्यातील विविध चालकांच्या संघटना सहभागी झाल्या आहेत. दरम्यान आज सकाळी दहाच्या सुमारास गोंदिया- बालाघाट आंतरराज्य मार्गावर कटंगी येथे टायर जाळून कायद्याच्या निषेध करण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास शहरातील जयस्तंभ चौक येथे वाहन चालकांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत कायदा मागे घेण्याची मागणी केली. यावेळी रस्त्यावरून धावणारी वाहने अडविण्यात आली. याला चालकांनी विरोध केला असता बळजबरी करणार्यांना पोलिसांनी पांगवून लावले.
दरम्यान रामनगर पोलीस, शहर पोलिसांनी अनेक आंदोलनकर्तांना ताब्यात घेतले. चालकांच्या आंदोलनामुळे शहराच्या बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, अन्नधान्याची आवक घटली असून त्यांचे दरही वाढल्याचे दिसून आले. खाजगी वाहने बंद असल्याने शहरासह जिल्ह्यातील अनेक बस थांब्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली तर इंधनाचा पुरवठा ठप्प झाल्याने बहुतांश पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांची गर्दी पहावयास मिळाली.