पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला 471 रक्तदात्यांनी
गोंदिया◼️ गोंदिया जिल्हा पोलिस दल व एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिराला जिल्ह्यातील रक्तदात्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. शिबिरात 471 रक्तदात्यांनी रक्तदान केले. संविधान दिनानिमित्याने तसेच गोंदिया जिल्हयातील नक्षलग्रस्त प्रभावित भागात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना नक्षली हल्ल्यात शहीद झालेले गोंदिया जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार त्याचप्रमाणे मुंबई शहर येथे आंतकी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी व अंमलदारांसह निष्पाप नागरिक यांच्या स्मृतीत व लोककल्याण कार्यास सहकार्य मिळावे, या उद्देशाने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली 26 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 6 पोलिस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यातंर्गत जिल्हा वाहतुक शाखा गोंदिया, पोलिस उपमुख्यालय देवरी, पोलिस ठाणे आमगाव, तिरोडा, सालेकसा व अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात सकाळी 10.00 वाजता ते सायंकाळी 5.00 वाजता दरम्यान रक्तदान शिबिर घेण्यात आले. विशेष म्हणजे, नित्यानंद झा यांनी स्वतः रक्तदान केले. त्याचप्रमाणे जिल्हा पोलिस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार, गृहरक्षक दल, तरुण-तरुणी, सामान्य नागरिक, प्रतिष्ठीत व्यक्तींनी रक्तदान केले. यात जिल्हा वाहतूक शाखेत आयोजित शिबिरात 76 रक्तदात्यांनी, पोलिस उपमुख्यालय देवरी 58, पोलिस ठाणे आमगाव 25, अर्जुनी मोरगाव 108, सालेकसा 160 व तिरोडा पोलिस ठाण्यात आयोजित शिबिरात 44 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना रक्तदान प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबिराच्या आयोजनासाठी एचडीएफसी बँकेचे क्लसटर हेड दीपक पाटील, शाखा आपरेशन मॅनेजर सुमित करमनकर, व्यवस्थापक हरिश ठाकरे, डॉ. शुभम तुपकर, डॉ. पल्लवी चौरागडे, लोकमान्य रक्तसंकलन केंद्राचे चेतन चव्हाण, राकेश भेलावे, रंजना मेश्राम, नेहा कटरे, स्नेहा रामटेके, रक्षणा बोरकर, रुपेश पंधराम, सुशांत पेंडारकर, जानकी बोपचे यांनी परिश्रम घेतले.