अतिदुर्गम गावांमध्ये क्षयरोग व कुष्ठरोग मोहिम प्रभावीपणे राबविणार : डॉ. ललित कुकडे
देवरी : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 20 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर या कालावधीत देवरी तालुक्यातील अतिदुर्गम गावोगावी कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती देवरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे यांनी दिली आहे.
मोहिमेदरम्यान तालुक्यातील आशासेविका, प्रशिक्षीत स्वंयसेवक घरोघरी सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्ण व क्षयरोग रुग्ण शोधत आहे. या मोहिमेकरता दोन सदस्यांची एक पथक राहणार असून हे पथक कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करुन आरोग्य संस्थेत संदर्भसेवा देण्यात येणार आहे. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी व उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी तपासणी करुन औषधोपचार करणार असल्याने घरी येणार्या पथकाकडुन तपासणी करण्याचे आवाहन डॉ. ललित कुकडे यांनी केले आहे.
तसेच अभियाना दरम्यान नागरिकांनी क्षयरोग व कुष्ठरुग्ण या आजाराबाबत गैरसमज व भिती न ठेवता आपल्याला होणारा त्रास न लपवता घरी येणार्या पथकाला सहकार्य करावे. कुष्ठरुग्ण व क्षयरोग हे दोन्ही आजार संपुर्ण उपचाराने बरा होवू शकतो. म्हणुन लोकांनी प्राथमिक स्तरावर जाणवणारे लक्षणे आरोग्य पथकास सांगावे. लवकर निदान, तत्पर उपचार केल्यास क्षयरोग व कुष्ठरुग्ण नक्कीच हमखास बरा होऊ शकतो, असे डॉ. ललित कुकडे यांनी सांगितले आहे.
मोहिमेच्या पहिल्याच दिवशी देवरी तालुक्यातील अतिदुर्गम उपकेंद्र शिंगणडोह व सुकळी गावात काही घरांना भेटी देवुन शोध मोहिम राबविण्यात आली. त्या वेळी आशासेविका ललिता मिरी व स्वंयसेवक मयुर अमरसिंग शेंदुर यांनी गावात भेट देवुन क्षयरोग व कुष्ठरुग्ण लक्षणे असलेल्या लोंकाना पोस्टर व लिफलेटच्या माध्यमातून जनजागृती केली. गावातील लोकांशी हितगुज करून मोहिमेबाबत जनजागृती केली.