खासदार अशोक नेते बालबाल बचावले : चारचाकीला टिप्परची धडक

गडचिरोली : येथील भाजपचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला भरधाव टिप्परने धडक दिली. एअरबॅग उघडल्याने खासदार नेते व चालक व सुरक्षारक्षक बालंबाल बचावले. नागपूरजवळील विहिरीगाव येथे ४ नोव्हेंबरला सकाळी ही घटना घडली.

खासदार अशोक नेते हे ३ नोव्हेंबरला मध्यरात्री मुंबईतून नागपूरला पोहोचले. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करुन ४ नोव्हेंबरला सकाळी ते गडचिरोलीला जाण्यासाठी चारचाकी वाहनाने (एमएच ३३ एए- ९९९०) निघाले होते. विहिरीगावजवळ त्यांच्या वाहनासमोर अचानक टिप्पर आले व समोरासमोर जोराची धडक झाली. यावेळी खा. नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते. खा. नेते हे समोरील सीटवर होते. त्यांच्यासह चालकाची एअरबॅग उघडली, त्यामुळे त्या दोघांसह आतील इतर तीन प्रवाशी सुखरुप बचावले. यानंतर मोठी गर्दी झाली. पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. खासदार नेते हे सहकाऱ्यांसमवेत दुसऱ्या वाहनाने गडचिरोलीत पोहोचले.

अपघात होऊनही नेते नियोजित दौऱ्यावर :
गडचिरोली- चिमूर हा राज्यात सर्वात विस्तीर्ण व दुर्गम, अतिदुर्गम गावे असलेला लोकसभा मतदारसंघ आहे. या क्षेत्राचे अशोक नेते हे दोन टर्म नेतृत्व करत आहेत. दांडगा जनसंपर्क असलेले लोकप्रतिनिधी म्हणून ते परिचित आहेत. अपघातानंतर ते गडचिरोलीत निवासस्थानी पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सर्वांशी संवाद साधून नेते हे अहेरीतील नियोजित दौऱ्यावर गेले.

विहिरगावजवळ आमच्या वाहनाला आडव्या रस्त्याने आलेला टिप्पर अचानक येऊन धडकला. जोराची आवाज झाला, एअरबॅग उघडल्याने कोणालाही इजा झाली नाही. मी लगेचच जनसेवेत रुजू झालो आहे. कार्यकर्त्यांनी काळजी करु नये.

Share