देवरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण

◼️देवरी येथे शंभर खाटाच्या सुसज्ज रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना

देवरी◼️आदिवासीबहूल व नक्षलग्रस्त भाग असलेल्या देवरी व आजुबाजूच्या नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून देवरी येथे शंभर खाटाच्या सुसज्ज रुग्णालयाचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली. देवरी येथे 7 कोटी 67 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा ग्रामीण रुग्णालय इमारतीचे आज, 26 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. मंचावर जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, जिप सभापती सविता पुराम, पूजा सेठ, नगराध्यक्ष संजय उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा सांगिडवार, माजी आमदार संजय पुराम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, वैद्यकीय अधीक्षक देवरी डॉ. गगन गुप्ता यावेळी उपस्थित होते. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला तत्पर आरोग्य सेवा देण्यासाठी हे रुग्णालय महत्वाचे ठरणार असल्याचा विश्‍वास पालकमंत्र्यांनी व्यक्त करुन बिरसा मुंडा ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत पाच हजार कोटी रुपये निधीची तरतूद केली असून या निधीमधून ग्रामीण रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयाने स्वच्छतेचा वसा जपावा व गोरगरिबांना रुग्ण सेवा द्यावी, अमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून नागरिकांनी अमली पदार्थ सेवन करू नये व या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. खा. अशोक नेते यांनी रुग्ण कल्याण समितीची बैठक नियमित घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी, ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या त्रुटी पूर्ततेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, सोबतच रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. माजी आ. संजय पुराम यांनी, आदिवासी बहुल असलेल्या या रुग्णालयाला क्रांती सूर्य बिरसा मुंडा नाव देण्याची मागणी केली. प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, डॉ. अमरीश मोहबे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. गगन गुप्ता यांनी केले.

Share