डॉ. गौरव बग्गा सेवेतून बडतर्फ

गोंदिया◼️ ऑनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरणात नागपूरच्या पोलिसांनी गोंदियातील डॉ. बग्गा दाम्पत्याच्या घरी शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी छापा टाकला. या कारवाईत तब्बल 1 कोटी 34 लाख रोकडसह 3 किलो 200 ग्रॅम सोन्याची बिस्कीटे हस्तगत केली. कारवाई नंतर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर रेडिओलॉजिस्ट पदावर कार्यरत डॉ. गौरव बग्गांना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांनी सेवेतुन बडतर्फ केले आहे.

ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली नागपूरच्या तरुणाची 58 कोटीं रुपयांनी फसवणूक करणार्‍या बुकी अनंत ऊर्फ सोंटू जैन तब्ब्ल 3 महिन्या नंतर नागपूर पोलिसांना शरण येताच नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सोंटू जैनला आर्थिक व्यवहारात मदत करणार्‍या डॉ. गौरव बग्गा आणि ऍक्सिस बँक शहर शाखेचे व्यवस्थापक अंकेश खंडेलवाल यांच्या घरावर नागपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल छापेमारी केली. ही कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती. यात डॉ. बग्गांच्या घरून 1 कोटी 34 लाख रोकडसह 3 किलो 200 ग्रॅम सोन्याची बिस्कीटे हस्तगत केली. अंकेश खंडेलवालांच्या घराचीही झडती घेतली असता काहीही मिळाले नाही.

Dr. Gaurav Bagga

गोंदियातील सोंटूच्या घरी 22 जुलै रोजी पडलेल्या धाडीत 16 कोटी 89 लाखाची रोख, 12 किलो 403 ग्रॅम सोने आणि 294 किलो चांदी मिळाली होती. डॉ. बग्गांना विशेष वाहनातून रात्रीत्र नागपूरला नेले. 16 ऑक्टोबर रोजी आत्मसमर्पण केलेला मुख्य आरोपी सोंटू पोलिस कोठडीत आहे. सोंटूचे मोबाईल कॉल रेकॉर्डिंग मिळवल्यानंतर तपासाला नविन वळण आले. सोंटूने मोबाईलमधील सर्व डेटा मिटवला होता. परंतु पोलिसांनी उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करून 200 मिनिटांच्या 8 कॉल रेकॉर्डिंगसह माहिती मिळविली. हे कॉल रेकॉर्डिंग अंकेश खंडेलवाल सोंटू, रेडिओलॉजिस्ट डॉ. बग्गा यांच्यात आहे.

गोंदियातील डॉ. बग्गा, खंडेलवाल यांच्यासह 5 ठिकाणी व भंडारा येथेही पोलिसांनी छापे टाकले. मात्र विशेष काही आढळले नाही. छापेमारीनंतर सोंटू, अंकेश खंडेलवाल, डॉ. गौरव बग्गा, डॉ. गरिमा बग्गा, सोंटूचा भाऊ धीरज जैन, धीरजची पत्नी श्रद्धा, सोंटूची आई कुसुमदेवी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share