उमेदच्या समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनात वाढ

गोंदिया◼️ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सीआरपी, प्रेरिका, सखी यांच्या मासिक मानधनात राज्य शासनाने भरीव वाढ केली आहे. आता सहा हजार रुपये मासिक मानधन मिळणार आहे. अभियान अंतर्गत स्थापन स्वयंसहायता समूहांच्या फिरता निधीमध्येही शासनाने वाढ केल्याचे भाजपा प्रदेश कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्या तथा जिल्हा परिषद सदस्या रचना गहाणे यांनी माहिती देत शासनाचे आभार मानले आहे.

ग्रामीणींच्या गरिबी निर्मूलनासाठी केंद्र शासनामार्फत दीनदयाळ अंतोदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. राज्यात अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानची स्थापना 2011 मध्ये करण्यात आली. शासनामार्फत 60 टक्के तर राज्य शासनामार्फत 40 टक्के अनुदान देण्यात येते. गरीब व जोखीम प्रवण महिलांना समृद्ध आत्मसन्मानाने व सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या सर्व समावेशक लोकशाही तत्त्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थाची निर्मिती करण्यात येत आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांतील 351 तालुक्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. समुदायस्तरीय संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरिका व विविध प्रकारच्या समुदाय संसाधन व्यक्ती कार्यरत आहेत. कार्यरत प्रेरिकांच्या मूल्यमापन करून अ, ब व क वर्गवारीनुसार दरमहा मानधन अदा करण्यात येते. इतर समुदाय संसाधन व्यक्ती सखी यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने निश्‍चित केलेल्या उद्दिष्टानुसार त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांच्या कामाच्या प्रगती अहवालानुसार त्यांना दरमहा मानधन अदा करण्यात येते. अभियाना अंतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहायता गटांच्या अ, ब वर्गावारीत श्रेणीकरण करून फिरता निधी वितरित करण्यात येतो. कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती सखी, प्रेरिका यांच्या मानधनात वाढ करणे व अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहायता गटांना देण्यात येणार्‍या फिरता निधीमध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. त्यानुसार समुदाय संसाधन व्यक्ती प्रेरिका, बँक सखी, आर्थिक साक्षरता सखी, पशु सखी, कृषी सखी, मत्स्य सखी, वन सखी यांना 3 हजार रुपये मासिक मानधन मिळत होते ते वाढवून 6 हजार केले आहे. मास्टर कृषी यांना 4500 एवजी 6000 रुपये मिळतील. कृषी उद्योग सखी, बीडीएसपी यांना 3500 एवजी 6000 रुपये मानधन वाढ मिळेल. हे मानधन कामाचे प्रचलित पद्धतीने मूल्यमापन करून कमाल सहा हजार रुपये दरमहा मानधन अदा करण्यात येणार आहे.

अभियाना अंतर्गत स्थापन स्वंय सहायता गटांना अ, ब व क वर्गवारीनुसार 15 हजार रुपये फिरता निधी वितरित करण्यात येतो. आता हा निधिही दुप्पट म्हणजे 30 हजार केला आहे. वर्गवारीनुसार फिरता निधी अनुदेय राहील. यापूर्वी ज्या स्वयंसहायता गटांना यांच्या वर्गवारीनुसार अभियानामार्फत फिरता निधी अदा केलेला आहे. अशा गटांना 15000 अतिरिक्त निधी देय राहील तसेच स्वंय सहायता गटांना फिरता निधी अद्याप दिलेला नाही परंतु जे स्वयंसहायता गट फिरता निधी मिळविण्यासाठी पात्र आहेत अशा स्वयंसहायता गटांना शासन निर्णयाच्या दिनांकपासून वरील प्रमाणे फिरता निधी त्यांच्या वर्गवारीनुसार अभियानातील प्रचलित पद्धतीप्रमाणे अणुदेय राहील. उमेदच्या समुदाय संसाधन व्यक्तींना दरमहा मानधनात वाढ करून सखींच्या चेहर्‍यावर आनंद झळकत असून शासन निर्णयाचे रचना गहाणे यांनी कौतुक केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share