अधिकारी, कर्मचार्यांनो ओळखपत्र बाळगा, अन्यथा होणार कारवाई!
गोंदिया : राज्य शासनातील सर्व आस्थापनांवर कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांनी ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबतचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 10 ऑक्टोबर रोजी जारी केला आहे. असे न करणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करण्याचेही पत्रात नमूद आहे.
शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिक त्यांच्या विविध कामाच्या निमित्ताने येतात. त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे नाव व पदनाम माहीत होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची ओळख पटणे आवश्यक आहे. परंतु शासकीय कार्यालयांत हजर असलेले अधिकारी, कर्मचारी हे दर्शनी भागावर ओळखपत्र लावत नाहीत. ओळखपत्राबात एखाद्या नागरिकाने विचारणा केली असता शासकीय अधिकारी, कर्मचारी ओळखपत्र दाखवीत नाहीत. या सर्व बाबी विचारात घेता सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे. या संबंधीचे 7 मे 2014 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करून यात नमूद सूचनांची अमंलबजावणी करण्याचे बजावण्यात आले आहे. असे असताना बहुतांश अधिकारी, कर्मचारी ओळखपत्र बाळगत नाही. असे करणार्या अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध वरिष्ठ अधिकार्यांनी कारवाई करण्याच्या सूचना आहेत.
या सूचनांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. शासकीय अधिकारी, कर्मचार्यांच्या प्रवेशाच्या वेळी पोलिस अधिकार्यांनी त्यांच्या ओळखपत्राची काटेकोरपणे तपासणी करून ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणार्या कर्मचार्यांची नावे संबधित प्रशासकीय विभागांना पाठविण्याची सूचना देखील या परिपत्रकात आहे. संबंधित प्रशासकीय विभागांनी ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणार्या कर्मचार्यांबाबत कारवाई करून त्याचा मासिक अहवाल विहित विवरणपत्रात सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्याचे सूचना परिपत्रकातून सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव आर. डी. कदम पाटील यांनी जारी केलेल्या पत्रकात नमूद आहे.