नवरात्रोत्सव व शारदोत्सवाचे नियोजन करा : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे
गोंदिया ◼️जिल्ह्यात नवरात्रोत्सव हा शांततेत, निर्विघ्नपणे पार पडावा व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीकोनातून उत्सवादरमयान कामाचे नियोजन, आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई आदी करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले.
जिल्ह्यात नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस सभागृहात आयोजित जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणेदारांच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. बैठकीत पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी मागील 5 वर्षांत नवरात्रोत्सवादरम्यान दाखल असलेले गुन्हे, चालूवर्षी दाखल झालेले जातीय स्वरुपाचे दखलपात्र व अदखलपात्र स्वरुपाचे गुन्हे, मागील 5 वर्षात दाखल असलेले महिला अत्याचाराचे गुन्हे, अवैध शस्त्र बाळगणारे, अवैध दारु, जुगार, मटका असे अवैध धंदे गुन्हेगार, जातीय तेढ निर्माण करणारे गुंड यांच्याविरुदध तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच दुर्गा देवी, शारदा देवी मंडपांमुळे शहरी व ग्रामीण भागातील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, ध्वनीप्रदुषण करणार्यांवर कारवाई करण्यासह विसर्जन मिरवणुकीदरम्यान व इतर वेळी आक्षेपार्य गाणी वाजविणार नाही याबाबत संबंधित मंडळाना सुचना द्याव्यात, विसर्जन मार्गावर विशेष आवश्यक बंदोबस्त नेमावा, माता दुर्गा देवी, शारदा देवी, उत्सव, मिरवणूक, दांडीया व इतर कार्यक्रम व विसर्जन मिरवणुकी दरम्यान महीला व मुलीचे छेडछाडीचे प्रकार घडू नयेत याकरीता प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर महिला छेडछाडविरोधी पथक तयार करुन त्यांना नवरात्र बंदोबस्त दरम्यान गस्त करण्यास नेमण्याची सूचना त्यांनी केली.
यावर्षी गोंदिया जिल्हयात संभाव्य 540 दुर्गा मातेच्या मूर्तीची तर व 533 शारदा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनतेने नवरात्रोत्सव शांततामय वातावरणात आपसी सौहार्द, सामंजस्य , कायदा आणि सुव्यवस्था राखून उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.