पोलिसांना मिळणार नकाशातून जिल्ह्याची अद्यावत भौगोलिक माहिती

गोंदिया ◼️जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांना आता जिल्ह्यातील विविध भौगोलिक परिस्थितीची सर्वसमावेशक माहिती नकाशाच्या माध्यमातून मिळणार आहे. यासाठी जिल्हा पोलिस विभागातर्फे उपविभागी व पोलिस ठाणेनिहाय अद्यावत नकाशे तयार करण्यात आले असून ते संबंधितांना देण्यात आले आहेत.

पोलिस तपासात भौगोलिक माहिती महत्वाची ठरते. भौगोलिक माहितीच्या इंत्यभूत माहितीच्या आधारे तपास लवकरात लवकर पूर्णत्वास येण्यास तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी निश्‍चितच मदत मिळते. यासाठी जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्वसमावेशक व उपयुक्त अशी भौगोलिक अशी माहिती संकलीत करुन पोलिस उपविभाग व जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणेनिहाय अद्यावत नकाशे तयार करण्यात आले आहेत. या नकाशांमध्ये जिल्ह्यांतील महत्वाच्या प्रमुख बाबींची, संवेदनशिल ठिकाणांची, अपघातप्रवण क्षेत्र, रेल्वे स्टेशन, बसस्टँड, मर्मस्थळे, धार्मिक स्थळे, पुतळे, महत्वाच्या यात्रा ठिकाणे, पर्यटनस्थळे, किल्ले, कारखाने, पुल, नदी, नाले, तलाव, धरणे व शासकीय कार्यालये आदींचा समावेश आहे.

तसेच अद्यावत नकाशामध्ये महाराष्ट्रालगतच्या सीमावर्ती भागातील मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातील बालाघाट, राजनांदगाव तसेच गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांच्या सिमावर्ती प्रमुख भागांची, गावांची व भौगोलीक परिस्थीतींची इत्यंभूत माहिती समाविष्ठ करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पोलिस ठाणेनिहाय अंतर्गत माहिती नकाशामध्ये दर्शविण्यात आली असल्यामुळे जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल भागातील माहिती मिळण्यास या नकाशांचा जिल्हा पोलिसांना निश्‍चीतच फायदा मिळणार आहे. नांदेड येथील एचआरपीएम इंडस्ट्रीज यांच्याकडून हे नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. अद्यावत नकाशे तयार करण्याकरिता नक्षल सेलचे अधिकारी, अंमलदार तसेच सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व गोपनिय अंमलदारांनी सहकार्य केले. हे सर्व नकाशे जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांना वितरीत करण्यात आले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share