उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जिल्हा प्रशासनाद्वारे तपासणी
गोंदिया ■ सांस्कृतिक खात्यातर्फे पर्यावरणपूरक गणपती उत्सवाला प्रोत्साहन म्हणून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील पाच सार्वजनिक गणेश मंडळाची तपासणी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार २०२३ स्पर्धा अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पू. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचेकडे केलेले विहित नमुन्यातील अर्जबाबत मंडळाची माहिती पू. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचेकडून जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली. त्या अनुषंगाने शासनाद्वारे गठीत जिल्हास्तरीय समितीने दिवसभर जिल्ह्यातील पाच सार्वजनिक मंडळाची पाहणी केली.
रामनगर नवयुवक गणेश मंडळ गोंदिया, नवज्योत गणेश उत्सव मंडळ गोंदिया, अष्टविनायक गणेश उत्सव मंडळ आमगाव, सार्व. बाल गणेश मंडळ बोंडगाव देवी अर्जुनी मोर आणि नवयुवक किसान गणेश मंडळ गणेश चौक देवरी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट ध्वनिप्रदूषण, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, आरोग्य व शिक्षण विषयक कार्य, राबविण्यात येत असलेले सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्वच्छता व इतर सुविधा याबाबत जिल्हा प्रशासनाद्वारे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जिल्हा प्रशासनाद्वारे तपासणी करण्यात आली.