जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार, निर्माणाधीन जलकुंभ जमीनदोस्त
गोंदिया ◼️ निर्माणाधीन जलकुंभाचे बांधकाम मानक व नियमानुसार होत नसल्याचा कारणावरून 80 टक्के बांधकाम झालेले जलकुंभ जमीनदोस्त करण्याचा प्रकार तालुक्यातील चिचगावटोला येथे उघडकीस आला आहे. प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हा शासनाचा उद्देश असून गोंदिया जिल्ह्यात 476 कोटींची जवळपास 250 गावांमध्ये शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत जलकुंभाचे निर्माण करण्यात येत आहे. मात्र या निर्माणाधीन कार्यालाही भ्रष्टाचाराचे गालबोट लागले आहे.
असाच प्रकार तालुक्यातील चिचगावटोला गावात उघडकीस आला असून याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे 6 महिन्यापूर्वी तक्रार केली होती. तक्रार करूनही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान जवळपास 80 टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि जलकुंभाची पाहणी केली. त्यात जलकुंभाचे कामात दोष असल्याचे दिसून आल्यानंतर निर्माणाधीन बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. सबुरी कंट्रक्शन कंपनीला 50 हजार रुपये दंड ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ठोठावल्याची माहिती आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या इतर पाणी टाकींचीही तपासणी केल्यास अनेक बांधकामांत दोष आढळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित कंत्राटदार व अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य करत आहेत.
मंजूर स्ट्रक्चर व मानकानुसार जलकुंभाचे बांधकाम नव्हते. उपकार्यकारी अभियंत्यांनी संबंधित कंत्राटदाराला सूचना देऊनही त्याने बांधकाम सुरूच ठेवले. कंत्राटदार कंपनीवर दंड ठोठावण्यात आला असून यापुढे कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया वरिष्ठ स्तरावरून करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्र यांनी सांगितले.