भजेपार येथील पर्यावरण दूतांचे गांधीजीना अनोखे अभिवादन

सालेकसा◼️ शांतीदूत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त भजेपार येथील 70 पर्यावरण दूत युवकांनी भजेपार ते आमगाव आणि आमगाव ते भजेपार अशी 30 किलो मीटर सायकलवारी करून महात्मा गांधीजींना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. सोबतच शांतीचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

सोमवार, 2 ऑक्टोंबर रोजी पहाटे 5 वाजता भजेपार येथील पर्यावरण दूत युवकांनी शांतीचा संदेश देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक भजेपार येथून सायकल रॅली काढली. दरम्यान महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या नावाचा जयघोष करत, सायकल चालवा प्रदूषण थांबवा, झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, पाणी अडवा पाणी जिरवा, सायकल चालवा आरोग्य टिकवा असे नागरिकांना आवाहन केले. सर्वांनी आपापल्या सायकलला संदेशात्मक पाट्या लावून हातात तिरंगा घेऊन नागरिकांचे ध्यानाकर्षण केले. यात गांधीजींच्या वेशात सहभागी झालेला युवक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. भजेपार येथून निघालेली सायकल वारी बोरकन्हार, बाम्हणी, पोवारीटोला, पद्मपूर, भवभूतीनगर मार्गाने आमगाव येथे पोहचल्यानंतर महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यानंतर अल्पोपहार करून त्याच मार्गाने सायकल रॅली श्री मंगरुबाबा चौरागड आश्रम तीर्थस्थळ व पर्यटन या ठिकाणी पोहचली. या ठिकाणी सायकलवारीचा समारोप करून निसर्ग भेट करण्यात आली. या उपक्रमासाठी ग्रामपंचायत भजेपार आणि माझी वसुंधरा पर्यावरण दूत यांनी पुढाकार घेतला. यात महात्मा गांधी तंटामुक्त समिती, शाळा व्यवस्थापन समिती, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष, भजेपार शिक्षण कल्याण संघ, चौरागड आश्रम समिती, सूर्योदय क्रीडा मंडळ, पाणलोट समिती, वन व्यवस्थापन समिती, सर्व महिला पुरुष बचत गटासह संपूर्ण गावकर्‍यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share