ब्लॉसम शाळेत ‘तान्हा पोळा’ उत्साहात साजरा
देवरी 17: तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे पोळा सणाच्या पर्वावर तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला.
मराठी संस्कृती, शेतकरी आणि शेती याविषयी माहिती विदयार्थ्यांना असावी, मराठी संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने पोळाच्या पर्वावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दीनबंधू संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार , कवी सुदर्शन लांजेवार, मोनीत रोकडे ज्वेलर्सचे संचालक प्रमोद रोकडे, सागर टायरचे संचालक प्रीतमसिंह भाटिया , प्राचार्य डॉ. सुजित टेटे उपस्थित होते.
यावेळी नंदी बैलांचे पूजन करून मराठी गौरव गीत सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमात प्ले ग्रुप , नर्सरी , केजी व इयत्ता १ली २ री चे विद्यार्थ्यांनी मराठी वेशभूषेत आणि आकर्षक नंदी बैल घेऊन सहभागी झाले होते. शाळेतील उत्साही विद्यार्थी मराठी वेशभूषेत शाळेत हजर होते. मराठमोळ्या अंदाजात नृत्य सादर करून सर्वांचा स्वागत केला. यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊ वितरण करण्यात आले.
तान्हा पोळा कार्यक्रमात विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव झाला असून प्रथम पुरस्कार रोकडे ज्वेलर्सचे संचालक प्रमोद रोकडे यांचे कडून २०ग्रॅम चांदीचे बिस्कीट, द्वितीय बक्षीस प्रीतमसिंह भाटिया यांचे कडून आकर्षक डिनर सेट, तृतीय आणि चतुर्थ बक्षीस शाळेकडून देण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
यामध्ये प्रथम क्रमांक मित लांजेवार, द्वितीय अरहत बोरकर, तृतीय सायली टेटे, चतुर्थ युवान बंग यांनी मिळविला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आयुष घोडेश्वार यांनी केले असून आभार प्रदर्शन तेजस हलमारे यांनी मानला.