बिजेपार-पुराडा मार्गावरील पर्यायी रपटा गेला वाहून
सालेकसा◼️तालुक्यातील बिजेपार-पुराडा रस्त्यावर पुलाचे बांधकाम अपूर्ण आहे. या मार्गावरून वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. तालुक्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे हा रपटा वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांच्या सालेकसा व देवरी तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. परिणामी गावकर्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
बिजेपार ते पुराडा मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कंत्राटदाराच्या माध्यमातून 55 लाख रुपयांच्या निधीतून पुलाचे काम सुरू आहे. पावसाळ्यात रस्ता अवरुद्ध होऊ नये म्हणून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे रपटा वाहून गेला आहे. या रस्त्यावर पूर्ण चिखल साचल्याने रस्त्यावरून वाहने तर जाणे बंदच झाले आहेत. अशा स्थितीत हा रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने चालणे कठीण झाले आहे. विद्यार्थी, वाहन चालकांना हा मार्ग ओलांडून कालीसरार धरणाकडे जाणे धोक्याचे आणि जीवघेणे ठरत आहे.
रात्री केव्हाही पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्यांना कालीसरार धरणाकडे जावे लागत असते, परिणामी प्रवास खडतर व त्रासदायक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या बायपास वळण मार्गावर मुरूम टाकून कंत्राटदाराची व्यवस्था करण्यासाठी कंत्राटदाराला अनेक वेळा पत्रव्यवहारही करण्यात आला. तसेच दूरध्वनीवर संपर्क साधून रस्त्यावर मुरूम टाकण्यास सांगितले. परंतु कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे नागरिक, विद्यार्थी व रस्त्यावरून चालणार्या कर्मचार्यांना त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर कंत्राटदाराला जाग येईल का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.