मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील धरणसाठे तुडूंब

गोंदिया◾️मागील वर्षातील परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यावर अपेक्षित असा परिणाम जाणवला नाही. मात्र आता मान्सूनच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या धरणांसह मध्यम व लघू प्रकल्पासह तलावातील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यतील जलाशयात मुबलक पाणी साठा असून सोमवार, 10 जुलै रोजी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील 9 मध्यम प्रकल्पात 35.909 दलघमी पाणी साठा आहे. ज्याची टक्केवारी 36 टक्के आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील 23 लघु प्रकल्पात 31.67 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच जलाशयात अनुक्रमे 20.2 व 12.74 टक्के पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली होती.

तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या धरणासह बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंदा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर, कटंगी व कलपाथरी असे 9 मध्यम प्रकल्प असून 23 लघु प्रकल्प व गोंदिया पाठबंधारे विभागाची 36 मामा तलाव आहेत. तर जिल्हा परिषदेच्या अख्त्यारीतील सुमारे दिडहजार जुने मामा तलाव आहेत. या तलावांची दरवर्षी मनरेगा व विविध योजनांतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून दुरुस्ती केली जाते. मात्र, योग्य दुरुस्ती व नियोजनाचा अभावामुळे दरवर्षी पाण्याची पातळी खालावत चालली आहे. विशेष म्हणजे, काही मोठ्या धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी वापरले जात असले तरी बहुतांश मध्यम प्रकल्पातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात हे जलाशय तळ गाठतात. मात्र, यंदाच्या परतीच्या पावसाने हे चित्र बदलले.

जिल्ह्यातील मोठ्या धरणांसह मध्यम व लघू प्रकल्पात यंदा मुबलक पाणीसाठा दिसून येत असताना जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यावर अपेक्षीत असा ताण आला नाही. त्यात आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून जून महिन्या शेवटच्या आठवड्यात व या महीन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळी वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमध्ये पाणीसाठा मुबलक आहे. आजघडीला सर्व 9 मध्यम प्रकल्पात 35.909 दलघमी पाणी साठा असून लघु प्रकल्पात 26.353 दलघमी पाणी साठा उपलब्ध आहे. तर पाटबंधारे विभागाच्या 36 मामा तलावांच्या साठ्यातही वाढ झाली असून 30.65 टक्के पाणी साठा झालेला आहे. मागील वर्षी मामा तलावांमध्ये आजच्या तारखेत 22.53 टक्के पाणी साठ्याची नोंद करण्यात आली होती यावरून यंदा जिल्ह्यातील जलाशय शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

Share