विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात गोंदिया राज्यात अव्वल
गोंदिया◾️राष्ट्रिय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या नेतृत्वात तब्बल 35 विविध राष्ट्रिय आरोग्य कार्यक्रम राबवुन लोकांना अविरत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. याच 35 विविध आरोग्य कार्यक्रम व उपक्रमांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्याने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याने पटकावला आहे.
डॉ. नितीन वानखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हा आरोग्य विभागाने उत्कृष्ट सांघिक कार्य व गाव पातळीवर केलेले सूक्ष्म नियोजनच्या जोरावर राज्यात प्रथम येण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याने पटकावला आहे. द्वितीय स्थानी रत्नागिरी जिल्हा तर तृतीय स्थानी वर्धा जिल्हाला सन्मानीत करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या राज्य पातळीवरील अधिकारांचे उपस्थितीत पुणे येथे राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली. याच बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त धीरजकुमार यांच्या हस्ते गोंदिया जिल्ह्याला प्रथम मानांकनाने गौरवण्यात आले. हा पुरस्कार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी स्वीकारला. प्रसंगी व्यासपीठावर आरोग्य विभागाचे राज्य पातळीवरील अधिकारी डॉ.आंबाडेकर डॉ. स्वप्नील लाळे, डॉ. गंधेवार, डॉ. सुमिता गोलाईत आदींची उपस्थिती होती.
भविष्यकाळात प्रभावीपणे सेवा देण्यावर भर
आरोग्य विभागाने नियोजन पूर्वक सातत्य राखून अविरत काम केल्याचे फळ मिळत आहे. आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी व गाव पातळीवरचे कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. भविष्यकाळात लोक सहभागातून अजून प्रभावीपणे सेवा देण्यावर आमचा भर राहील. आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती अंतर्गत सर्व माहिती पोर्टलवर विहित कालमर्यादेत भरण्यावर जोर देण्यात येणार असल्याचे जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटिल यांनी सांगितले.