भंडारा उपविभागातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया रद्द

3 अधिकारी झाले होते निलंबित

भंडारा◾️ भंडारा उपविभागात झालेल्या पोलीस पाटील पद भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा ठपका ठेवून उपविभागीय अधिकाऱ्यांसह दोन तहसीलदारांना निलंबित करण्याच्या कारवाईनंतर आता शासनाने झालेली भरती प्रक्रिया रद्द केली आहे. झालेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्यात शासन मान्यता देत असल्याचे पत्र शासनाने काढले आहे. दरम्यान प्रक्रिया रद्द झाल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेतून भारती झालेल्या 49 पोलीस पाटलांना कायमस्वरूपी कार्यमुक्त करीत असल्याचे आदेश देत त्यांची सेवा समाप्त केली आहे. भंडारा जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबविली गेली. ही प्रक्रिया राबविताना भंडारा उपविभागात असलेल्या भंडारा आणि पवनी तालुक्यात घोळ झाल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी केली गेली. या चौकशीत तत्कालीन उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे, तत्कालीन पवनीच्या तहसीलदार नीलिमा रंगारी प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता.

या अहवालाच्या आधारे काही दिवसांपूर्वी तीनही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यासोबतच भरती प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्याने सदर भरतीसाठी राबविण्यात आलेली प्रक्रिया रद्द करून नव्याने पोलीस पाटील पदभारतीची प्रक्रिया घेण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरून निर्देश देण्यात यावे अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली होती. याच आधारे 30 जून 2023 रोजी शासनाने एक पत्र काढून भंडारा उपविभागातील पोलीस पाटील पदभरतीची प्रक्रिया रद्द केली आहे. भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्यात शासन मान्यता देत असल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाने भरती प्रक्रिया रद्द केल्यानंतर स्थानिक स्तरावर भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी या अनुषंगाने कारवाई सुरू केली आहे. जुन्या भरती प्रक्रिये द्वारा भरती झालेल्या भंडारा तालुक्यातील 23 आणि पवनी तालुक्यातील 26 पोलीस पाटलांना कायम कार्यमुक्तीचे आदेश 4 जुलै रोजी देत त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने पोलीस पाटील भरती प्रक्रिया होऊन ती पारदर्शक रित्या होईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

Print Friendly, PDF & Email
Share