हेल्मेट वापरासाठी जनजागृती करा : खा. अशोक नेते

गोंदिया ◾️रस्त्यावरील अपघातामध्ये दुचाकी अपघाताचे प्रमाण अधिक आहे. अपघात नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. दुचाकीवरून प्रवास करतांना नागरिकांनी हेल्मेट वापरावे, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात यावी अशी सूचना समिती अध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी केली.

संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, खासदार सुनील मेंढे, आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा जयेश भांडारकर, नगरपरिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेल्मेट वापरासाठी जनजागृती करण्यासाठी अशोक नेते यांच्या हस्ते हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला. जिल्ह्यातील अपघातांचा तपशीलवार आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच ब्लॅकस्पॉट व अपघातप्रवण स्थळांचा आढावा घेण्यात येऊन त्यावर उचित उपाययोजना करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या दोषी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विना हेल्मेट दुचाकी चालवणार्‍या वाहन चालकांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करणेबाबत सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी सादरीकरण केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Share