नोटा बदलविण्यासाठी ऐनवेळी केवायसीची अट रखरखत्या उन्हात बँकांत गर्दी

◼️काही ठिकाणी दागिने खरेदीसाठी लगबग

देवरी◼️ देशातील सर्वात मोठा चलनी नोट म्हणजे दोन हजार रूपयांची नोट परत घेण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर पर्यंत नोटा परत घेण्यात येणार आहेत. २३ मे पासून नोट परत घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बँकेत नोट परत करण्याकरिता रांगा लावत आहेत. त्यातच बँकांनी आता केवायसी आणि आधारकार्डाची सक्ती केल्यामुळे नागरिकांना बँकांतून आल्यापावली परत जाव लागल्याचे पाहणीतून समोर आले.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनेनुसार २३ मे ते ३० सप्टेंबर पर्यंत नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रूपयांचे नोट बँकेत बदलता येणार आहेत किंवा आपल्या खात्यात जमा करता येणार आहेत. त्याकरिता कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे नागरिकांना आपल्याकडे असलेल्या नोटा बदलून घेण्याकरिता बँकांमध्ये मोठ्याप्रमाणात गर्दी केली. परंतु नोटा बदलविण्यासाठी ऐनवेळी केवायसीची अट असल्यामुळे नागरिकांनी रखरखत्या उन्हात बँकांत गर्दी केल्याचे चित्र आहे.

२०१८ मध्ये झालेल्या नोटबंदीची नागरिकांना माहिती आहे. त्यामुळे ते आता सावध पवित्रा घेत आहेत. रिझर्व्ह बँकेने दोन हजार रूपयांच्या नोटा परत घेण्याची घोषणा केली. तेव्हापासून गेल्या दोन वर्षापासून बाजारातून गायब झालेल्या नोटा पुन्हा फिरू लागल्या आहेत. पेट्रोलपंपावर एक व्यक्ती एक नोट नेत आहेत. मात्र सर्वाधिक नोटा सोन्या- चांदीच्या दागिन्यांच्या दुकानांत जमा होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.

Share