शासकीय काम आणि सहा महिने थांब ही पद्धत नष्ट करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी : शासकीय कामासाठी होणार्‍या दिरंगाईमुळे नागरिक हैराण आहेत, त्यामुळे शासकीय काम आणि सहा महिने थांब ही पद्धत नष्ट करायची आहे. तहसीलदार, कलेक्टर कार्यालयातील चकरा थांबवायच्या आहेत. शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

रत्नागिरीमध्ये आज शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तब्बल 43 कोटी रुपयांचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. विविध दाखले, विविध योजनांमधून लाभार्थ्यांना मिळालेल्या साहित्याचा लाभही देण्यात आला. जवळपास 25 हजार लाभार्थी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंदर विकास मंत्री दादा भूसे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार रविंद्र फाटक, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

लोकांच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच शिवसेना व भाजपाचे सरकार वाटचाल करीत आहे. मागील सत्ताधार्‍यांची कुर्मगतीने वाटचाल सुरु होती. मात्र सध्याचे सरकार स्थापन झाल्यापासून 35 कॅबिनेट बैठका झाल्या यातून साडेतीनशे लोकहिताचे निर्णय घेण्यात आले. सर्वसामान्यांचे जीवन सुखाचे झाले पाहिजे त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही घरी न बसता सरकार लोकांच्या दारी आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. भविष्यात एका दिवसात नागरिकांना योजनांचा लाभ मिळेल यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने उत्तम कामगिरी बजावली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत, त्यांनी योग्य समतोल साधल्यास रथ वेगाने धावेल व राज्याचा विकासही वेगाने होईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. वरिष्ठ अधिकारी वर्ग आता शेताच्या बांधावर जात आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकारीही गावोगावी जाऊ लागले असल्याने, सर्वसामान्यांची कामे वेगाने होऊ लागली आहेत.

राज्य शासन अनेक योजना बनवत आहे. एसटीमध्ये महिलांना पन्नास टक्के सुट दिल्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. ज्येष्ठांनाही एसटीत सवलत देण्यात आली आहे. याचा लाभही सर्वांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम वेगाने सुरु आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: यात लक्ष घातले आहे. त्यामुळे हा महामार्ग लवकर होईल. त्याचप्रमाणे कोकणातील जनतेचा प्रवास अधिक वेगाने होण्यासाठी मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड मार्ग केला जाणार असून त्याच्या डीपीआरचे काम सुरु असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share