देवरी ब्रेकिंग 🚨फसवणूक करुन तो बनला महाविद्यालयाचा प्राध्यापक आणि सहकाऱ्याला केले प्राचार्य, गुन्हा दाखल

तालुक्यातील सुरतोली लोहारा येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील प्रकार

देवरी◼️ महाविद्यालयातील कर्मचार्‍याने खोटे प्रमाणपत्र विद्यापीठाला सादर करुन स्वतः पूर्णकालीन प्राध्यापक तर अन्य दुसर्‍याला प्राचार्य म्हणून नियुक्ती केल्याचा प्रकार देवरी तालुक्यातील सुरतोली लोहारा येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात उघडकीस आला.

जनता बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचालित सुरतोली लोहारा येथील डॉ. आंबेडकर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सचिव राजकुमार केवळराम मडामे हे महाविद्यालयाचा कारभार पहात होते. दरम्यान त्यांनी 2012 मध्ये आरोपीची कर्मचारी म्हणून नेमणूक केली व महाविद्यालयाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी सोपविली. मात्र आरोपीने आपल्या पदाचा गैरवापर करीत सचिवांना वा संस्थेला कोणतीही पूर्वसूचना वा माहिती न देता दुसर्‍या आरोपीची तात्पुरत्या स्वरुपातील प्राध्यापक म्हणून नेमणूक केली.

दरम्यान 2019 मध्ये सचिव राजकुमार मडामे यांनी महाविद्यालयाचा कारभार हाती घेतला असता आरोपी कर्मचारी व त्याने नियुक्त केलेल्या तात्पुरत्या प्राध्यापकाचे नाव प्राध्यापकांच्या फलकावर पूर्णकालीन प्राध्यापक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मडामे यांनी दोन्ही आरोपीच्या नेट परीक्षेचे प्रमाणपत्राची झेरॉक्स पडताळणीसाठी युजीसी दिल्ली येथे पाठविले असता ते प्रमाणपत्र बनावटी असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आरोपीने सचिव व संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या खोट्या स्वाक्षर्‍यासह बनावटी प्रमाणपत्र विद्यापीठाला सादर करुन स्वतःची प्राध्यापकपदी व दुसर्‍या आरोपीची प्राचार्यपदी नियमबाह्य नियुक्ती करुन महाविद्यालयाची फसवणूक केल्याची बाब समोर आली. याप्रकरणी राजकुमार मडामे यांच्या तक्रारीवरुन देवरी पोलिसांनी आरोपींवर भादंवि 420, 465, 467, 468, 471 अन्वये अपराध क्रमांक 160/2023 गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share