ग्रा.पं सदस्यांना मिळणार 3 वर्षांचा थकीत बैठक भत्ता

गोंदिया◼️tग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांना बैठक भत्ता मिळतो. परंतु जिल्ह्यातील सदस्यांना मागील 3 वर्षाचा भत्ता सदस्यांना अदा करण्यात आला नाही. बैठक भत्त्याच्या मागणीसाठी सदस्य तसेच सरपंच परिषदेमार्फत याविषयी वेळोवेळी मागणी व पाठपुरावा करण्यात आला. त्याला यश मिळाले असून 3.16 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून जिल्ह्याला प्राप्त झाला.

जिल्ह्यात 2019-20 या वर्षात 546 ग्रामपंचायतींच्या 4586 सदस्यांना 50233 उपस्थित दिवसांकरीता 1.004 कोटी, 2020-21 करीता 4571 सदस्यांना 57452 उपस्थित दिवसांकरीता 1.14 कोटी व 2021-22 करीता 4582 सदस्यांना 50487 उपस्थित दिवसांकरीता 1.009 कोटी याप्रमाणे सदस्यांच्या एकूण 158172 उपस्थित दिवसांकरीता 3.16 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषदेला हा निधी प्राप्त झाला असून लवकरच तालुकास्तरावरून सदस्यांना वाटप करण्यात येणार असल्याबाबदची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर यांनी दिली. बैठक भत्ता मंजूर केल्याबद्दल सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष तिजेश गौतम यांनी राज्य शासनाचे व जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त केले.

Print Friendly, PDF & Email
Share