वन्यप्राणी प्रगणना निसर्गानुभव कार्यक्रम तीन जूनला
गोंदिया◼️वन्यप्राणी प्रगणना निसर्गानुभव 2023 कार्यक्रम 3 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आल्याचे नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक पवन जेफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत बौध्द पौर्णिमेला 5 व 6 मे दरम्यान निसर्गानुभव 2023 कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु सदर कालावधीत सलग पाऊस येत असल्यामुळे पानस्थळावरील निसर्गानुभव कार्यक्रम रद्द करण्यात आला.
आता 3 जून 2023 रोजी पौर्णिमेच्या दिवशी वन्यप्राणी प्रगणना निसर्गानुभव कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात 40 प्रगणकांचा समावेश राहणार असून मचानीवर बसण्याकरीता 21 मे ते 22 मे दरम्यान सकाळी 10 वाजतापर्यंत आवेदन स्विकारण्यात येतील. आवेदनपत्राची नोंदणी ऑनलाईन पद्धती करायची असून इच्छूक निसर्गप्रेमी यांनी याची नोंद घ्यावी, असे उपसंचालक नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र पवन जेफ यांनी कळविले आहे.