प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे देवरी शहरात प्लास्टिक बंदीचा फज्जा!
देवरी ०९: देशभरात गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीचा देवरी शहरात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चक्क फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे नगरपंचायत प्रशासनाने प्लास्टिक बंदीचे आखलेले धोरण कारवाई शून्य दिसून आले. यामुळे स्वच्छ देवरी सुंदर देवरी या संकल्पनेला गालबोट लागल्याचे शहरातील चित्र आहे.
सद्य:स्थितीत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या सर्रास उपयोगात येत असून प्लास्टिक बंदी फक्त जाहिरातबाजी करण्यापुरती होती असे दिसून येत आहे. वाढत्या प्लॅस्टिकच्या वापराला प्रशासनच जबाबदार आहे हे मात्र खरे!
शासनाने पूर्णत: प्लास्टिकबंदी आणली त्यामध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नये, असे स्पष्ट करण्यात आले. सरकारी कार्यालये, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकची फुले, बॅनर्स, प्लास्टिकचे झेंडे, फुलांचे पॉट्स, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदी वस्तूंचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्लास्टिकप्रमाणेच थर्माकोलच्या उत्पादनांवरदेखील बंदी घालण्यात आली. त्यानुसार डेकोरेशनसाठी वापरण्यात येणारी प्लास्टिक आणि थर्माकोलची उत्पादने बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहेत. परंतु, पातळ स्वरूपातील पन्नी सर्वत्र दिसून येते. भाजीपाल्याची दुकाने, फुलांची दुकाने, फळविक्रेते, मटण-चिकनची दुकाने, औषध विक्रेते, रेडिमेड गारमेंट यांसह सर्व लहान-मोठ्या दुकानांत पन्नी बिनधास्त वापरली जात आहे. वापर झाल्यानंतर पन्नी कुठीही फेकून देण्यात येते. त्यामुळे दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.