रेल्वेतून साडेसात किलो गांजा जप्त

गोंदिया: रेल्वे पोलिस दलाच्या नार्कोस अभियानातंर्गत गोंदिया रेल्वे पोलिसांनी 1 मे रोजी पुरी-सूरत रेल्वेगाडीतून साडेसात किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत 72 हजार 420 हजार रुपये आहे.

आगामी कनार्टक राज्यातील निवडणुका लक्षात घेता दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागातर्फे नार्कोस अभियान राबविले जात आहे. यातंर्गत गोंदिया दलातर्फे अभियान राबवित असताना पुरी-सुरत एक्सप्रेस गाडीतून अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गोंदिया रेल्वेचे प्रभारी पोलिस निरीक्षक विनोदकुमार तिवारी व त्यांच्या पथकाने पुरी-सूरत एक्सप्रेस फलाट क्रमांक तीन पोहचताच गाडीची तपासणी केली.

यावेळी रेल्वेच्या शेवटच्या साधारण डब्ब्यात एक काळ्या रंगाची बॅग बेवारस स्थितीत आढळली. डब्ब्यातील प्रवाशांनाही बॅगबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी राजपत्रित अधिकारी अपर तहसीलदार प्रकाश तिवारी यांच्यासमक्ष बॅग उघडली असता बॅगमध्ये दोन प्लॉस्टिक बंडलमध्ये गांजा आढळला. या गांजाचे वजन साडेसात किलो असून 72 हजार 420 रुपये किमत आहे. पुढील तपास गोंदिया रेल्वे पोलिस करीत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विनोदकुमार तिवारी, उपनिरीक्षक सीकेपी टेंभुर्णीकर, प्रधान आरक्षक राजेंद्र रायकवार, आरक्षक विवेक कनोजिया, महिला आरक्षक ज्योती भौतेकर, आरक्षक रोशन बछाटे यांनी केली.

Share