हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ चे लोकार्पण, देवरी येथे आपला दवाखाना सुरु

गोंदिया ◼️सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून संपूर्ण समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढवण्याकरिता हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना सेवा देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. यातंर्गत 1 मे रोजी जिल्ह्यात 8 ठिकाणी ‘आपल्या दवाखान्या’चे लोकार्पण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यात 50 टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे. शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणार्‍या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे 15 व्या वित्त आयोग अंतर्गत स्थापित केली जाणार आहेत. यातंर्गत जिल्ह्यात गोंदिया शहरात छोटा गोंदिया येथे, तिरोडा येथे भिमनगर, गोरेगाव येथे गोकुळ हॉटेलजवळ, आमगाव येथे कामगार चौक, देवरी येथे चिचगड रोड, सालेकसा येथे फॉरेस्ट ऑफिसजवळ, सडक अर्जुनी येथे कठाणे हाऊस आणि अर्जुनी मोर येथे वॉर्ड क्र.5, हनुमान मंदिराजवळ आपल्या दवाखान्याचे लोकार्पण 1 मे रोजी करण्यात आले आहे.

या दवाखान्यात बाह्यरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेली कन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषतज्ञ संदर्भ सेवा आदी सेवा देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या तालुक्यात सुरू होणार्‍या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात देण्यात येणार्‍या मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी केले आहे.

Share