जिल्हा युवा पुरस्काराने देवरीची “दिनबंधु ग्रामीण विकास संस्था” सन्मानित

देवरी ◼️महाराष्ट्र दिन आणि कामगारदिनाच्या निमित्ताने गोंदिया येथे आयोजित एका शासकीय कार्यक्रमात राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा विभागाने देवरी येथील “दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेचा” जिल्हा युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा निवड समिती यांच्या वतीने दरवर्षी क्रीडा व अन्य सामाजिक क्षेत्रात युवक व युवतीं अन्य समाजातील घटकांकरिता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडू, व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी केलेल्या लोकहितार्थ कार्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो. त्या अंतर्गत सन २०२०-२०२१ या वर्षाच्या व्यक्तिगत आणि संस्था पुरस्काराकरिता आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये ग्रामीण व शहरी क्षेत्रात युवक व युवती तसेच इतर समाज घटकांकरिता क्रीडा शिक्षण तथा अन्य सामाजिक क्षेत्रात सदोदित कार्य करणाऱ्या “दिनबंधु ग्रामीण विकास संस्था देवरी” या सामाजिक संस्थेची जिल्हास्तर युवा पुरस्कारकाराकरिता (संस्था) निवड करण्यात आली.  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस मुख्यालय गोंदिया येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र, स्मृतीचिन्ह आणि पुरस्कार अनुदान रकमेचा धनादेश वितरित करून संस्थेच्या कार्याचा गौरव करण्यात आला.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड,तालुका क्रीडा अधिकारी मरस्कोले,क्रीडा मार्गदर्शक नाजूक उईके, धनंजय भारसाकडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार यांच्यासह संस्थेचे विश्वस्त चेतन उईके,प्रशांत सावलकर, सौ.कल्याणी लांजेवार यांनी हा सन्मान स्विकारला.

दिनबंधु ग्रामीण विकास संस्थे अंतर्गत जिल्ह्यातील आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त भागातील युवक व युवतीं आणि नागरिकांकरिता सर्वच क्षेत्रात करत असलेल्या समाजहितार्थ कार्याची ही परतफेड असून प्रशासनाने पुरस्कार प्रदान करून पुन्हा संस्थेची जवाबदारी वाढवली असून निश्चत हे कार्य अविरत सुरू ठेवणार असून या पुरस्काराचे खरे मानकरी संस्थेला सदोदित मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी,मित्र परिवार आणि समाजसेवक हे असून या पुढील कार्यासाठी संस्थेला या सर्व मंडळीचे पाठबळ मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व हितचिंतकांचे आभार संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share