लोकवर्गणीतून भजेपार जिप शाळेचा कायापालट

सालेकसा◼️विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भजेपार येथील जिल्हा परीषद शाळेच्या जणू भिंतीही बोलू लागल्या आहेत. येथील माजी विद्यार्थ्यांनी चक्क 1 लाख 23 हजार रुपये लोक वर्गणीतून गोळा करुन आकर्षक रंगरंगोटी व दुरुस्ती करून शाळा बोलकी केली आहे. यासाठी पुढाकर घेणार्‍या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष टेकराम बहेकार यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सदस्य रेवतकुमार मेंढे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास आला आहे. लोकवर्गणीसाठी कुठेही न जाता फक्त व्हॉट्स अ‍ॅपवर शाळेच्या अस्तित्वाला वाचविण्याचे व शाळेचा कायापालट करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि गावकर्‍यांनी प्रचंड प्रतिसाद देत लाख रुपयांची रक्कम अवघ्या काही दिवसातच उभा केला आणि बघताबघता शाळेचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली.

1.23 लाख रुपयांच्या निधीतून शाळेच्या डेस्क बेंच दुरुस्ती, आकर्षक रंगरंगोटी व भौतिक सुविधेची कामे करण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष प्रतिमा बहेकार, सदस्य नरेश फुन्ने, चंद्रकुमार पाथोडे, भुमेश्वर मेंढे, नंदकुमार ब्राह्मणकर, संजय चुटे, शोभा बहेकार, चुन्नेश्वरी चुटे, इंद्रकला शिवणकर, लता कलचार यांच्यासह गावातील होतकरू तरुण आणि संपूर्ण ग्रामवासियांनी परिश्रम घेतले. समितीने घेतलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्याध्यापिका एम. एम. देवरे, केंद्रप्रमुख डी. व्ही. भूते, सहाय्यक शिक्षक जी. एन. तुरकर, एन. जी. घासले, आर. एम. भोयर, व्ही. एस. मेश्राम, अरुण कोटेवार यांनी समितीचे आभार मानले असून गुणवत्ता वाढीसाठी सर्वकष प्रयत्न करण्याची हमी दिली आहे.

नवोदयचे निःशुल्क शिवकणी वर्ग

सरपंच चंद्रकुमार बहेकार, उपसरपंच कुंदा ब्राह्मणकर, सदस्य रविशंकर बहेकार, रेवतचंद बहेकार, राजेश बहेकार, ममता शिवणकर, सरस्वता भलावी, मनिषा चुटे, आत्माराम मेंढे, आशा शेंडे यांच्या पुढाकारातून गुणवत्ता वाढीसाठी नवोदय आणि शिष्यवृत्तीचे निःशुल्क वर्ग शाळेत घेतले जात आहेत. अध्यापनासाठी मुकेश पाथोडे, कमलेश मेंढे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. 

505 साहित्यासह सुसज्ज लॅब 

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी व इनोव्हेशन सेंटर मुंबई तर्फे एकूण 505 साहित्याच्या माध्यमातून सुसज्ज सायन्स लॅबोरेटरी तयार करण्यात आली असून यासाठी पुणे येथील युरोकोर्न कंपनीचे सहकार्य लाभले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share