वनविभागाच्या भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवित देवरीत ग्रामसभांचा स्वाभीमान मोर्चा

उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देत नोंदविला निषेध

Deori-सामुहिक वनहक्क दाव्यांतर्गत ग्रामसभांना तेंदुपान संकलनाचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. मात्र देवरी तालुक्यातील ग्रामसभांवर वनविभागाने निर्बंध लादून त्यांच्या अधिकारांवर गदा आणली आहे. या प्रकाराचा निषेध आणि विरोध करण्याच्या उद्देशाने संयुक्त ग्रामसभांच्या वतीने आज(ता. २५)हजारो नागरिकांचा मोर्चा काढून देवरी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर स्वाभीमान मेळावा घेत वनविभागाच्या भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवित मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर केले.मोर्च्यात आमदार सहसराम कोरेटे,ग्रामसभा मंडळाचे नारायन सलामे, तेजराम मडावी, सुदाम भोयर, नारायण ताराम, विलास भोगारे, उमेश बागडेहरीया, गणेशराम राउत, गजानन शिवणकर यांनी सहभागी होत निवेदन सादर केले.वनविभागाने ग्रामसंभाच्या कार्यक्षेत्रात सुरु केलेला शिरकाव तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
वनहक्क धारकांस वनहक्क कायदा २००६ मधील प्राप्त अधिकारा नुसार वनांवर सामुहिक वनहक्क प्राप्त झाले आहेत. त्यात ग्रामसभेला गौण वनउपज संकलन व विक्रीचे सर्व स्वामीत्व अधिकार दिलेले आहेत. त्याचे पारंपारीक क्षेत्रातून ( कलम ३ (१) (ग) ) प्रमाणे वनहक्क धारक तेंदुपाने व ईतर वनउपज संकलन करण्याचे अधिकार प्राप्त आहेत. असे असताना उपवनसंरक्षक गोंदिया यांनी तेंदुपत्ता संकलन व विक्री करण्याकरिता ग्रामसभांना अडचणी निर्माण केल्याचे ग्रामसभांचे म्हणने असून वनविभागाच्या या भूमिकेविरोधात मोर्चा काढून आपला रोष सरकारकडे नोंदवला.

Share