शासकीय तांदुळ चोरांना मुद्देमालासह अटक
गोंदिया: शासकीय तांदूळ चोरी करणार्या चौघांना मुद्देमालासह अटक केली. मनीष महेन्द्र शेंडे (30) रा. कुर्हाडी, सुधीर बेसराज शहारे (35) रा. मुंडीपार, संजय डोमळे रा. मिलटोली आणि धर्मेन्द्र मारबदे रा. धिमरटोली अशी अटकेतील आरोपींवी नावे आहेत. ही कारवाई गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आज मंगळवार 25 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया-गोरेगाव मार्गावरील धिमरटोली येथे केली.
ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन म्हेत्रे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीनुसार वाहन क्रमांक एमएच 35 जे 1071 मधून शासकीय तांदाची चोरीने वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. या संदर्भात म्हेत्रे यांनी वरिष्ठांना कळवून त्यांच्या निर्देशाप्रमाणे म्हेत्रे यांनी रात्र गस्तीवरील पथकाला वाहनाचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देत स्वतः म्हेत्रे कारवाईसाठी रवाना झाले. पथकाने धिमरटोली फुडलैंड हॉटेल येथे नाकाबंदी केली. दरम्यान वरील क्रमांचे वाहन गोंदियाकडुन गोरेगावकडे येताना दिसताच पोलिसांनी वाहन थांबवून पाहणी केली असता वाहनात मागे डाल्यामध्ये 9 व कॅबीनमध्ये 2 असे 11 इसम बसल्याचे दिसुन आले.
चालक सुधीर शहारे यास वाहनातील मालाबाबत विचारले असता त्याने वाहनात तांदुळ असून धर्मेन्द्र मारवदेच्या मदतीने मुंडीपार येथे घेवुन जात असल्याचे सांगीतले. मनीष शेंडे याने वाहनात मागे मालावर बसलेले लोक हमाल असल्याचे सांगुन मीलटोली येथील बम्लेश्वरी गोदामातुन संजय डोमळे व धर्मेन्द्र मारबदे यांचे मदतीने प्रत्येकी 50 किलो वजनाचे 185 कट्टे तांदुळ चोरल्याचे त्याने सांगीतले. तपासणीत सदर तांदुळ शासकिय योजनेचा असल्याचे दिसुन आले. 1 लाख 85 हजार रुपये किमतीचा तांदूळ व 10 लाख रुपये किमतीचे वाहन असा 11 लाख 85, हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून वरील चारही आरोपींना अटक करून ग्रामीण पोलिस स्टेशन येथे कलम 380, 381, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.