खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करा
गोंदिया : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा 16 एप्रिल रोजी खारघर येथे घेण्यात आला. या सोहळ्यात 14 निष्पापांचा बळी गेला. घटनेला सर्वस्वी शासन जबाबदार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अॅड. अभिजीत वंजारी यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सोमवार 24 एप्रिल रोजी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेला पदवीधर मतदार संघाचे आमदार अॅड. अभिजीत वंजारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च नागरी सन्मान 1967 पासून देण्याची परंपरा आहे. पुरस्कार वितरण सोहळा नेहमीप्रमाणे राजभवनात गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत आयोजित करणे अपेक्षित होते. परंतु शासनाने केवळ आपल्या प्रसिद्धीच्या हवाशापोटी आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांच्या मतदारांवर डोळा ठेवून हा सोहळा सार्वजनिकरित्या घेतला. तापमान 40 अंशावर असताना श्री सेवकांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. जवळपास 20 लाख अनुयायी या सोहळ्याला उपस्थित झाले होते. गर्दी व उष्माघातामुळे 14 अनुयायांचा नाहक बळी गेला. 500 पेक्षा अधिक लोकांना बाधा होऊन त्यांचा आरोग्यावर परिणाम झाला.
शासन अधिकृतरित्या 14 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत असले तरी हा आकडा शंभरावर आहे, सत्ताधार्यांनी आपल्या सोयीनुसार वातानुकूलित व्यासपीठ तयार केले होते. परंतु अनुयायांसाठी कोणतीच व्यवस्था केली नसल्याचा आरोपही यावेळी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी पत्र परिषदेत केला. घटनेला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. शासनाने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा या मागण्यांचा ठराव काँग्रेस कमिटी घेणार असून यासंबंधीचे निवेदन राज्यपाल यांना पाठविण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी यावेळी सांगितले. कारवाई न झाल्यास काँग्रेसतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचेही वंजारी म्हणाले. पत्र परिषदेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, जिप, पंसचे आजीमाजी पदाधिकारी उपस्थित होते.