Gondia: कोरोना काळातील दुकानभाडे माफ

गोंदिया◼️जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पंचायत समिती स्तरावरील दुकानगाळ्यातील दुकानदारांना कोरोना काळातील भाडे माफ झाले आहे. तसेच यापुढे प्रतिवर्ष ऐवजी दर 3 वर्षांनी होणार भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय 11 एप्रिल रोजी आयोजित जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या मालकीचे पंचायत समिती स्तरावर असलेले दुकानगाळे पंचायत समिती स्तरावर भाड्याने देण्यात आलेले आहे. कोरोना काळात व्यापार ठप्प होता. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न दुकानदारांपुढे उभा झाला होता. त्यामुळे कुटूंबाचे पालनपोशन करायचे की, दुकानभाडे भरायचे अशा ‘इकडे आड तिडके विहीर’ परिस्तिथी दुकानदारांपुढे होती. कोरोनाकाळात भाड्यात सूट मिळावी, यासाठी अनेक दुकानदारांनी मागणी केली होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांना सुद्धा अनेकदा दुकानदारांनी निवेदन देऊन दिलासा देण्याची विनंती केली होती. त्यावेळेस कोरोनाकाळातील दुकानभाडे माफ करण्याची बाब जिल्हा परिषदेच्या बैठकीत विचाराधीन घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते.

दरम्यान 11 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत दुकानदारांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात प्रामुख्याने एकरकमी समझोता करणार्‍या दुकानदारांना 12 महिन्यांचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या दुकानदारांनी नियमित भाडे भरले आहे, त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. त्यांचे भाडे पुढील देयकांमधून वजा करण्यात येईल. काही दुकानांचे भाडे 3 हजार व 2 हजार असून दरवर्षी 5 टक्के भाडेवाढ करण्यात येते. सोबतच 2019 पासून कसलीही भाडेवाढ करण्यात आली नव्हती. 1 मे पासून 10 टक्के भाडेवाढ करण्यात येईल व त्यानंतर थेट 3 वर्षांनी 10 टक्के भाडेवाढ करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.

दुकानदारांनी केले निर्णयाचे स्वागत

जिल्हा परिषदेने 12 महिन्याचे भाडे माफ केल्यामुळे तसेच भाडेवाढमध्ये दिलासा दिल्याबद्दल दुकानदारांनी निर्णयाचे स्वागत केले असून जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांचे अभिनंदन केले आहे.

Share