Breaking: सोनी हत्याकांडातील 7 मारेकर्‍यांना जन्मठेप, भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

भंडारा: जिल्ह्याला हादरवून सोडणार्‍या तुमसर शहरातील सोनी हत्याकांडात दोषी आढळलेल्या सर्व सात आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज ( दि. ११) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्याकांडाच्या नऊ वर्षांनतर हा निकाल देण्यात आला आहे. शहानवाज उर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, सोहेल शेख, रफिक शेख, केसरी ढोले अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

तिघांचा खून करुन साडेतीन कोटींचा सोन्याच्या दागिन्यावर डल्ला

२६ फेब्रुवारी २०१४ च्या मध्यरात्री तुमसर येथील प्रतिष्ठित सोनेचांदीचे व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा द्रुमिल यांचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला होता. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिघांच्याही मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या घरातून ८ किलो ३०० ग्रॅम किलो सोने, ३४५ ग्रॅम चांदी आणि रोख ३९ लाख रुपये असा एकंदरीत साडेतीन कोटींचा ऐवज पळवून नेला होता.

घटना उघडकीस आल्याच्या २४ तासात सर्व सात आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या घटनेमुळे जनक्षोभ मोठ्या प्रमाणात वाढला होता. शासनाने या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांची नेमणूक केली होती. सोमवारी (ता.१०) जिल्हा न्यायालयाने सात आरोपींवर आरोप निश्चित केले. आज दुपारी तीन वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Print Friendly, PDF & Email
Share