सावधान! टायर घासलेल्या चारचाकी वाहनांना ‘समृद्धी’वर प्रतिबंध

नागपूर : टायर घासलेल्या अवस्थेत समृद्धी महामार्गावरून जाऊ इच्छिणाऱ्या दोन चारचाकी वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) गुरुवारी प्रतिबंध घातला. या तिन्ही वाहनांवर प्रत्येकी २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे.

समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे प्राणांकित अपघात सर्वसामान्य नागरिकांसह सरकारचीही चिंता वाढवत आहेत. त्यामुळे राज्याच्या परिवहन खात्याने अपघात नियंत्रणासाठी येथे आता आरटीओच्या मदतीने वाहनांची तपासणी, सक्तीने समुपदेशन सुरू केले आहे. त्याअंतर्गत गुरुवारी नागपूर आरटीओने ‘ट्रेड डेप्थ इंडिकेटर’ने चारचाकी वाहनांचे टायर तपासले. त्यात टायरमधील रबरची घनता तपासण्यात आली.यावेळी काही वाहनांचे टायर जास्त घासलेले आढळले. या टायरसह सलग वाहन चालवणे धोकादायक होते. त्यामुळे या दोन्ही वाहनांना महामार्गावरून जाण्यास प्रतिबंध घातला गेला. सोबत या दोन्ही वाहनांवर केंद्रीय मोटार वाहन रस्ता सुरक्षा कायदा १९० अंतर्गत प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, अशी माहिती नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.

शंभर दिवसांत ९०० अपघात

नागपूर-शिर्डीदरम्यान पहिल्या १०० दिवसांमध्ये ९०० अपघात झाले. त्यात २२ मार्चपर्यंतच्या ३२ प्राणांतिक अपघातांचा समावेश आहे. टायर पंक्चर होऊन १५ टक्के,तर टायर फुटल्याने १२ टक्के अपघात झाले. त्यामुळे घासलेल्या टायरच्या वाहनांवर प्रतिबंध घालून मोठ्या अपघातांवर नियंत्रणाचा प्रयत्न आहे.

Share