गुणवंतांना रोख बक्षिसे, अधिकारी झाल्यास काढणार मिरवणूक!

◼️गुणवत्तेला वाव देण्यासाठी भजेपार ग्राम सभेचा प्रेरणादायी निर्णय

सालेकसा: गावातील प्रतिभावंत विद्यार्थी व युवक युवतींच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी भजेपार ग्राम पंचायतीने प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे तथा अधिकारी होऊन गावाचा गौरव वाढविणाऱ्या यशवंत विद्यार्थांची मिरवणूक काढून भव्य दिव्य सत्कार करण्याचा क्रांतिकारी निर्णय ग्राम सभेने पारित केला असून या निर्णयाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
नुकत्याच झालेल्या ग्राम सभेत निर्णय घेण्यात आला की, इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या गावातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये रोख, नवोदय विद्यालय मध्ये निवड झाल्यास 3 हजार रुपये रोख आणि ‘भजेपार गौरव’ पुरस्काराने त्यांचा आई वडिलांसह सत्कार करण्यात येईल. शासकीय नोकरीत जाणाऱ्या प्रत्येक युवक युवतींचा ‘भजेपार गौरव’ पुरस्काराने सन्मान केला जाईल. एमपीएससी, यूपीएससी सारख्या परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होणाऱ्या तथा गावाचा गौरव वाढविणाऱ्या युवक युवतींची गावात भव्य दिव्य मिरवणूक काढून त्यांचा आई वडिलांसह ‘भजेपार गौरव’ पुरस्काराने सन्मान केला जाईल. सरपंच चंद्रकुमार बहेकार यांनी ग्राम सभेत यासंबंधी प्रस्ताव ठेवला असता तो एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी उपसरपंच कुंदा ब्राह्मणकर, ग्राम पंचायत सदस्य रवीशंकर बहेकार, रेवतचंद बहेकार, राजेश बहेकार, मनीषा चुटे, सरस्वता भलावी, ममता शिवणकर, आत्माराम मेंढे, आशा शेंडे सहित गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिभावंत विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची अधिकाधिक प्रेरणा मिळावी,त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे, गावात मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी घडावेत, गुणवत्तेतून गावाची प्रगतीकडे वाटचाल व्हावी या उदात्त हेतूने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला असून प्रेरणादायी आणि तेवढाच गौरवशाली आहे.

सत्कारातून मिळते ईतरांना प्रेरणा : चांगल्या कार्याचा आणि यशाचा गुणगौरव झालाच पाहिजे. जेणेकरून ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. गावातील विदयार्थी आणि युवक- युवतींमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी आणि गावातून मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी घडावेत या उदात्त हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

चंद्रकुमार बहेकार, सरपंच
Print Friendly, PDF & Email
Share