हाजरा फॉल पर्यटन स्थळाच्या विकासात पडणार १० कोटीची भर, संजय पुराम यांच्या प्रयत्नाला यश
गोंदिया ◼️जिल्ह्याच्या संवेदनशील नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यात निसर्गरम्य हाजरा झरा (फॉल) आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यांतील निसर्गप्रेमीसाठी हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील निसर्गरम्य सौंदर्याचा मनमुरद आनंद घेण्यासाठी येथे दररोज शेकडोंच्या संख्येने पर्यटक येतात, मात्र येथे पाहिजे त्या प्रमाणात सोयीसुविधा नसल्याने पर्यटक अनेकदा खंत व्यक्त करतात. आता या पर्यटन स्थळाच्या विकासाठी शासन 10 कोटींचा निधी देणार असल्याने हाजरा फाल पर्यटन स्थळाच्या विकासात भर पडणार आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर 7 पर्वतांमध्ये वसलेले हाजरा झरा पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्याला सुरवात होताच पर्यटकांना हाजरा फॉलची आठवण होते. शेकडो मीटर उंचीवर असलेल्या धबधब्यातून पाणी वेगाने खाली कोसळते. राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे शासन असताना या स्थळाच्या विकासाठी निधी उपलब्ध झाला होता. फॉरेस्ट आणि इको टुरिझमच्या विकास निधीतून ब्रह्मा ब्रिज, मल्टीवाइन रिच, विसाफे ब्रिज आणि कमांडो नेट बसवण्यात आले आहेत. या धबधब्याचे विहंगम नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येथे येतात. ब्रिटिशकालीन हाजरा फॉलचे सुत्र स्थानिक वनव्यवस्थापन समितीने हाती घेताच हाजरा फॉलला भरभराटी आली. असे असले तरी येथे पर्यटकांना अपेक्षित सुविधा नसल्याने ते नाराजी व्यक्त करून जातात.
या पर्यटनस्थळी येणार्या पर्यटक, निसर्गप्रेमींना सोयीसुविधा, मनोरंजनात्मक साधने उपलब्ध व्हावीत, स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजी आमदार संजय पुराम यांनी मागील महिन्यात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांना वन विभागाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत 10 कोटींचा निधी देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. पुराम यांच्या मागणीची दखल घेत 10 कोटींचा विकास निधी हाजरा फॉल पर्यटन स्थळाच्या विकासाठी मिळणार आहे. यासंबंधी आवश्यक ती कारवाही करावी व तसा अहवाल त्वरीत सादर करावा, या आशयाचे पत्र राज्याच्या महसुल व वन विभागाच्या कक्ष अधिकारी ॠतुजा गवळी यांनी जारी केले आहे.