दुर्मिळ काळा बिबटची शिकार केल्याची कबुली, वन्यप्राणी तस्करप्रकरणी आणखी चौघांना अटक

◼️दुर्मिळ काळा बिबटची झाली शिकार

देवरी ◼️: गोंदिया जिल्ह्यातील चिचगड वनविभाग व पोलिसांनी रविवार, 26 फेब्रुवारी रोजी पालांदूर जमी. येथे झडतीदरम्यान एका आरोपीला अटक करुन वन्यप्राण्यांचे अवयव जप्त केले होते. दरम्यान त्याचदिवशी रविवारी मंगेझरी येथून आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे अवयव जप्त केले आहे.

जिल्ह्यात वन्यप्राण्याच्या अवयवांची तस्करी व विक्री होणार असल्याची गुप्त माहिती विशेष व्याघ्र संरक्षण दल व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार वनाधिकार्‍यांनी पोलिसांसह रविवार, 26 फेब्रुवारीला संयुक्त कारवाई प्रथम पालांदूर जमी. येथे रवींद्र लक्ष्मण बोडगेवार यांच्या घराच्या झडतीत वाघाचे नख व दात व अस्वलाचे हृदय तसेच 21 लाख रुपये रोख व 84 हजार रुपयांची देशी दारु जप्त केली होती. त्यानंतर मंगेझरी येथे धाड टाकून चार आरोपींना अटक केली. शामलाल विक मडावी, दिवास कोल्हारे, माणिक दरसू ताराम, अशोक गोटे सर्व रा. मांगेझरी अशी आरोपींची नावे आहे.

यातील आरोपी माणिक दरसू ताराम हा आत्मसमर्पित नक्षलवादी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींच्या ताब्यातून वाघ किंवा बिबट या मांजर कुळातील वन्यप्राण्यांचे 2 दात, 1 नख, अस्वलाची 3 नखे, 10 रानडुक्कर सुळे, चितळाचे 1 शिंग, सायाळ प्राण्याचे काटा, खवल्या मांजराचे खवले, ताराचे फासे, 1 जीवंत मोर, 5 बंडल मोरपिसे, रानगव्याचे 1 शिंग, जाळे, सुकलेली हाडे, रक्त पापडी (झाडाची साल), सुकवलेले मांस हस्तगत करण्यात आले. पाचही आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला.

तपासात आरोपींनी दुर्मिळ काळा बिबटची शिकार केल्याचेही समोर आले व त्याबाबतचे पुरावे हस्तगत करण्यात आले. दरम्यान, आरोपींकडून जप्त करण्यात आलेली रोख रक्कम दारू विक्रीतील नसून वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या व्यवहारातून मिळाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने तपास सुरू असून आणखी काही आरोपी असल्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी वर्तवली.

Share