केंद्रीय निवडणुक आयोगाच्या विरोधात शिवसेना (ठाकरे) गटाचे राष्ट्रपतींच्या नावे निवेदन

देवरी ◼️केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला बहाल केल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे देवरी तालुका शाखेच्या वतीने तीव्र निषेध केला असून या निर्णयाचा विरोध दर्शविणारे निवेदन महामहिम राष्ट्रपतींच्या नावे देवरीच्या तहसीलदारांना देण्यात आला.

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वात सेना कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ आज स्थानिक तहसील कार्यालयावर धडकले. केंद्रीय निवडणूक आयोगाने बेकायदेशिररीत्या लोकशाहीची हत्या करीत शिवसेना या पक्षाचे नाव आणि निवडणुक चिन्ह हे शिंदे गटाला बहाल केल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. ही भारतीय लोकशाहीची खुलेआम कत्तल असल्याचे तालुका प्रमुख मिश्रा यांनी म्हटले. मा.राष्ट्रपती महोदयांनी या प्रकरणात लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

Share