रात्री मारहाण आणि दुसर्‍या दिवशी वनरक्षक बेपत्ता

तिरोडा– गोरेगाव ते तिरोडा मार्गावरील बोदलकसा तलावाजवळ वनरक्षकाला पाच अनोळखी इसमांनी अडवून मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटून वनरक्षकाने तिरोडा गाठले. या प्रकरणाची तक्रार तिरोडा पोलिसात तुर्त नोंद केली. मात्र दुसर्‍या दिवशी सकाळीच तो वनरक्षक बेपत्ता झाला. ही घटना १५ व १६ फेब्रुवारीची आहे. नीतेश मनोहर राऊत (वय ३५) असे बेपत्ता झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे. वनरक्षक नितेशचा शोध पोलिसांसह वनविभाग घेत आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून त्याचा थांगपत्ता नसल्याने शंकाकुशंकेला पेव फुटले आहे.
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील झांजिया येथील मुळचा रहिवासी नितेश मनोहर राऊत हा वन्यजीव विभागात वनरक्षक पदावर तिरोडा येथे कार्यरत आहे. १५ फेब्रुवारी रोजी नितेश दुचाकीने बोदलकसा मार्गाने तिरोडाकडे जाण्यासाठी निघाला. दरम्यान रात्री ८.३0 वाजता सुमारास बोदलकसा तलावाजवळ त्याला ४ ते ५ अनोळखी इसमांनी अडवून मारहाण केली. दरम्यान त्या इसमांच्या तावडीतून सुटून नितेश याने तिरोडा गाठले. या प्रकरणाची तक्रार तुर्त तिरोडा पोलिस ठाण्यात फिर्यादी अमित नाईक याच्या तक्रारीवरून करण्यात आली. तक्रारीची सहनिशा केली असता नितेशची दुचाकी जंगल शिवारात जळालेल्या अवस्थेत सापडली. यावरून तिरोडा पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडे नितेश व त्याचा मित्र अमित हे दोघे तिरोडा येथे राहत्या घरी गेले. दरम्यान सकाळी ६ वाजता सुमारास चहा घेण्यासाठी जातो म्हणून घरून निघाला. मात्र, तो परतलाच नाही. त्याचा शोध घेतला परंतु, कसलाही पत्ता लागला नाही. या घटनेची तक्रार नितेशच्या कुटूंबाकडून तिरोडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. नितेश गेला कुठे? असा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. त्याचबरोबर नीतेश बेपत्ता झाल्याने वनविभागातही एकच खळबळ उडाली आहे. नितेशचा घातपात तर झाला नाही, अशा शंका-कुशंकेला पेव फुटले आहे.

Share