देवरीचे ठाणेदार म्हणून सेवा दिलेले भागोजी औटी यांचे सुपुत्र शहीद कॅप्टन सौरभ औटी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

राळेगण सिद्धी : जम्मू- काश्मीरमधील लेह लडाख येथे कर्तव्यावर असताना शहीद झालेले कॅप्टन सौरभ औटी यांना आज (सोमवार) सकाळी तालुक्यातील राळेगण सिद्धीमध्ये साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कॅप्टन सौरभ औटी हे देश सेवेत जम्मु काश्मीर येथे कार्यरत होते. ते कर्तव्यावर असताना मागील आठवड्यात लेह-लडाख भागात त्याच्या वाहनाला अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्याच्यावर उपचार चालू असताना शनिवारी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह लष्करी विमानाने पुणे येथे व तेथुन लष्करी वाहनाने राळेगण सिद्धी येथे आणाण्यात आला. लष्करी इतमामात अंतसंस्कार करण्यात आले

यावेळी जेष्ठ समाजसेवक पद्मभुषण अण्णा हजारे, खासदार डॉ. सुजय विखे, लष्करातील वरिष्ठ अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रांत अधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार शिवकुमार आंवळकंठे, पारनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक घनश्याम बळप, बिडीओ किशोर माने, अण्णा हजारे युवा मंचाचे अध्यक्ष राहुल शिंदे, बडू रोहकले यांच्यासह तालुक्यासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.

Share