‘हर हर महादेव’च्या तालात गजबजले प्रतापगड

गोंदिया : दोन वर्षानंतर यावर्षी जिल्हावासीयांनी महाशिवरात्रीचा उत्सव थाटामाटात साजरा केला. जिल्ह्यातील प्रतापगड व नागरा या मोठ्या महाशिवरात्री यात्रेसह प्रत्येक तालुक्यातील शिव मंदिरात, तिर्थस्थळावर शिवभक्तांची मांदयाळी पहायला मिळाला. ‘हर हर महादेव’च्या निनाद व सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवभक्त व आयोजकांनी देवाधिदेव महादेवाला नमन केले.

जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सवाच्या तयारीला मागील दोन दिवसापासून सुरुवात झाली होती. आज, 18 फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच भाविकांनी महादेवांच्या पुजनाची सुरुवात केल्याचे दिसून आले. शहरासह ग्रामीण भागात पुजन, प्रसादांची दुकाने खुली झाली. पुजन, प्रसादाचे साहित्य खरेदी केल्यावर प्रथम घरी व त्यानंतर स्थानिक मंदिर, जवळील तसेच जिल्ह्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्रात जाऊन शिवभक्तांनी महादेवाची मनोभावे पुजन केले. जिल्ह्यात महादेवांचे अनेक प्रसिद्ध व श्रद्धेचे मंदिर, देवस्थाने आहेत. अर्जुनी मोर तालुक्यातील प्रतापगड हे क्षेत्र सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. नागरा येथील मंदिर श्रद्धेला पावणारे मानले जाते. याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शिवमंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने आज भाविकांनी महादेवाची भक्तीभावाने पुजन केले. शिवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणी सामाजिक जाणीव ठेवत अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे, व्यक्तींकडून लोकोपयोगी कार्य केले गेले.

प्रतापगड येथील महाशिवरात्री यात्रेत जिल्ह्यासह मध्य प्रदेश, छत्तीसगड व विदर्भातील भाविक लाखोच्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजनबद्ध खबरदारी घेण्यात आली. पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. तर वाहतुकीत कोणतीही अवस्था होऊ नये म्हणून सुकळी फाटा येथून एकेरी वाहतूक वळविण्यात आली होती. यात्रेत भाविकांसाठी आमदार नाना पटोले व मित्र परिवारातर्फे प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Print Friendly, PDF & Email
Share